कामात मन रमविणे हीच शेतकऱ्यांची करमणूक...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 04:39 IST2021-05-23T04:39:00+5:302021-05-23T04:39:00+5:30
कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल ...

कामात मन रमविणे हीच शेतकऱ्यांची करमणूक...
कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रावर परिणाम झाला आहे. कृषी क्षेत्रही याला अपवाद ठरले नाही. शेतकऱ्यांना तर कोरोना व लॉकडाऊनमुळे शेतमाल विकताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच शेतातील कामे करतानाही मजूर मिळत नसल्याने ताणतणावात राहावे लागतेय. अशा काळात तणाव दूर करण्यासाठी शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. कधी शेतीविषयक माहिती मिळवत आहेत. तर काहीवेळा त्यातून गाणी ऐकण्याचा आनंदही घेत आहेत. काहीजण घरात टीसव्ही बघत आहेत. या मनोरंजनापेक्षा शेतकऱ्यांना आता खरीप हंगाम तयारीचे वेध लागले आहेत. त्यामुळे कामात मन रमविणे हेच करमणुकीचे साधन झाले आहे.
मागील एक वर्षापासून जिल्ह्यात कोरोनाचे संकट कायम आहे. कधी त्याची तीव्रता कमी होते तर काहीवेळा वाढते. पण, या कोरोना संकटाचा परिणाम कृषी क्षेत्रावर खूप मोठ्या प्रमाणात झालेला आहे. त्यातच अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टी यामध्ये शेतकरी पिचलाय. पिकलेल्या मालाला भाव मिळत नाही. विकायचा झाला तर आठवडी बाजार बंद. बाजार समितीत घेऊन जायचं झालं तर उठाव आणि दर नाही. यामुळे शेतकरी तणावात आहेत. त्यातच आता खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यासाठी बियाणे आणि खतांची जुळणी करायची आहे. पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकायची आहेत. मात्र, कोरोना लॉकडाऊनमुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतीची खूप कामे करायची आहेत. वेळ आहे पण कोरोनामुळे बाहेर पडणे अवघड झाले आहे. त्यामुळे शेतकरी मोबाईलमध्येही रमू लागले आहेत. त्यामधून शेतीविषयक चांगली माहिती मिळवणे, गाणी ऐकणे अशाप्रकारे ते आपली करमणूक करून घेत आहेत. काही शेतकरी तर मोबाईलवरून विविध बाजार समितीमधील दाराची माहिती घेत आहेत. काही शेतकरी शेतशिवारात जाऊन शक्य तसे शेतीची कामे करत आहेत. कारण, खरीप हंगाम तयारी आतापासूनच केली तरच पाऊस झाल्या-झाल्या पेरणीला सुरुवात करता येणार आहे. एकप्रकारे कोरोना तणावातही शेतीची कामे करणे शेतकऱ्यांसाठी मनोरंजनच ठरणारे आहे.
चौकट :
बळीराजासाठी शेतीच श्वास अन् घास...
बळीराजा वर्षभर शेतीतच रमत असतो. कितीही संकटे आली तरी त्याला त्यापासून दूर पळता येत नाही. एका पिकाने दगा दिला तर दुसरे पदरात टाकेल, असा विश्वास असतो. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी शेती हा श्वास असतो तर पिकल्यावर घास मिळवून देणारा आधार ठरतो. वर्षभर शेतीत रमणाऱ्या शेतकऱ्यांना कोरोनामुळे प्रथमच थोडासा विसावा मिळालाय. पण, हा विसावाही शेतकऱ्यांना शिक्षा वाटते. कारण, खरीप हंगाम तोंडावर आलाय. त्यामुळे कामं करावीच लागणार आहेत.
- नितीन काळेल
.........................................................................