गडकरींमुळेच सिंचन योजना बंद

By Admin | Updated: September 14, 2014 00:01 IST2014-09-14T00:00:27+5:302014-09-14T00:01:22+5:30

आर. आर. : पश्चिम महाराष्ट्रातील प्रकल्पावरून टीका

The irrigation scheme is closed due to Gadkari | गडकरींमुळेच सिंचन योजना बंद

गडकरींमुळेच सिंचन योजना बंद

सांगली : ज्यांनी पश्चिम महाराष्ट्राला मराठवाड्याचे शत्रू बनविले, या भागाचा तिरस्कार केला, त्याच नितीन गडकरींचे जिल्ह्यातील लोक स्वागत करीत आहेत, ही खेदाची बाब आहे. अनुशेषाचा मुद्दा उपस्थित करून पश्चिम महाराष्ट्रातील सिंचन योजना बंद पाडण्याचे काम गडकरींनी केले, अशी टीका गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी आज, शनिवारी सांगलीत राष्ट्रवादीच्या बैठकीत केली.
येथील जिल्हा कार्यालयात ही बैठक पार पडली. यावेळी ग्रामविकास मंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते. आर. आर. पाटील म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्राचा नेहमीच ज्यांनी द्वेष केला, त्या गडकरींनी आम्हाला येथे येऊन उपदेशाचे डोस देऊ नयेत. त्यांनी अनुशेषाचा मुद्दा उपस्थित केला. आम्हाला दरोडेखोर ठरवून पश्चिम महाराष्ट्राने सिंचनाचा पैसा नेला, असा आरोप त्यांनी केला होता. अशा स्वार्थी लोकांचे स्वागत करण्यापेक्षा येथील जनतेने त्यांचे काळे झेंडे दाखवून स्वागत करायला हवे होते. सभागृहात याच विषयावर केलेली त्यांची भाषणे जनतेला ऐकवून दाखविली, तर त्यांचे खरे स्वरूप येथील जनतेला कळेल.
ते म्हणाले की, मराठा, जैन, लिंगायत आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणाबाबत घेतलेले निर्णय भाजप नेत्यांना खटकले आहेत. धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत राज्य शासनाने केंद्राकडे पत्र पाठविले आहे. केंद्रात आता भाजपची सत्ता येऊनही धनगर समाजाच्या आरक्षणाचा निर्णय का झाला नाही, याचा जाब आता धनगर समाजातील युवकांनी विचारायला हवा.
राजू शेट्टी यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करताना आर. आर. पाटील म्हणाले की, ज्यांनी दिवाळीला आंदोलनाचा मोसम आणि बारामतीला आंदोलनाची पंढरी बनविले, त्यांचे तोंड आता केंद्राच्या शेतकरीविरोधी धोरणावेळी गप्प आहे. कांदा निर्यात करून स्थानिक कांदा उत्पादकांचे, तर निर्यातीवर निर्बंध आणून डाळिंब उत्पादकांचे कंबरडे या केंद्र सरकारने मोडले.
कॉँग्रेसचे सरकार असताना प्रतिक्विंटल साखरेसाठी मिळणारे निर्यात अनुदान भाजप सरकारने बंद केले आहे. तरीही टायर पेटवून रस्त्यावर येणारे शेतकऱ्यांचे नेते आता गप्प आहेत. यापुढे शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राष्ट्रवादीचे लोक रस्त्यावर उतरतील. ते अशी आंदोलने करतील की, शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्यांना रस्त्यावरून फिरणे मुश्कील होईल.
जयंत पाटील म्हणाले की, सर्वेक्षणावर कार्यकर्त्यांनी विश्वास ठेवू नये. २८८ मतदारसंघांपैकी केवळ १५ मतदारसंघांतील चाचण्यांवर हे सर्वेक्षण अवलंबून आहे. यावेळी बैठकीस आमदार मानसिंगराव नाईक, खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील, इलियास नायकवडी, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, रमेश शेंडगे, जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, दिनकर पाटील, बाबासाहेब मुळीक, उषाताई दशवंत, लीलाताई जाधव उपस्थित होते. शरद लाड यांनी स्वागत केले, तर ताजुद्दीन तांबोळी यांनी आभार मानले.
पतंगरावांवर टीका
राष्ट्रवादीला कॉँग्रेसमध्ये विलीन होण्याचा सल्ला काही नेते देत आहेत. यांच्याकडे कुणीही सल्ले मागत नाहीत, तरीही ते सल्ले द्यायचे थांबत नाहीत, अशा शब्दांत आर. आर. पाटील यांनी पतंगराव कदम यांची अप्रत्यक्षरीत्या खिल्ली उडविली.

Web Title: The irrigation scheme is closed due to Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.