शिक्षणावरील गुंतवणूक सर्वोत्तम गुंतवणूक
By Admin | Updated: December 29, 2014 23:37 IST2014-12-29T22:17:35+5:302014-12-29T23:37:14+5:30
भारत खराटे : शिबिराला विद्यार्थी-पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

शिक्षणावरील गुंतवणूक सर्वोत्तम गुंतवणूक
सातारा : ‘अनेक पालकांची तळमळ असते. जे मला करता आले नाही, ते आपल्या मुलाला देण्याचा प्रयत्न करत असतात. कारण तुमच्या असण्यामध्ये ते स्वत:ला पाहत असतात. शिक्षणावर केलेली गुंतवणूक ही सर्वोत्तम गुंतवणूक असते, हे पालकांनीही लक्षात घेतले पाहिजे,’ असे मत चाटे शिक्षण समूहाचे विभागीय संचालक प्रा. भारत खराटे यांनी येथे व्यक्त केले.
‘लोकमत बाल विकास मंच’ व चाटे शिक्षण समूहातर्फे ‘विद्यार्थी व पालकांसाठी विशेष शैक्षणिक मार्गदर्शन ’ आयोजित केलेल्या शिबिरात ते बोलत होते. कार्यक्रमाचे उद्घाटन लोकमतचे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने प्रा. भारत खराटे यांनी केले. यावेळी राजेश पवार, एस. जे. पाटील, राजेंद्र घुले उपस्थित होते.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘दहावी बोर्ड परीक्षेची अंतिम टप्प्यातील तयारी व भविष्यातील स्पर्धा परीक्षा आणि संधी’ आणि सातवी, आठवी, नववीच्या विद्यार्थ्यांसाठी उज्ज्वल उद्यासाठी या विषयावर विशेष शैक्षणिक मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते. दोन सत्रात झालेल्या या कार्यक्रमामध्ये विद्यार्थी व पालकांनी हॉल पुर्ण भरून गेला होता.
प्रा. प्रा. भारत खराटे म्हणाले, ‘आपण आपल्या पाल्याला योग्यवेळी योग्य ठिकाणी सहकार्य करणे गरजेचे असते. पालकांनी लक्षात घेतले पाहिजे. या टप्प्यामध्ये विद्यार्थ्यांचा एका बाजूला करिअर डिसाईड होत असतं आणि दुसऱ्या बाजूला आपले पाल्य प्रीएज होत असते. म्हणून या टप्प्यामध्ये मुलांकडे लक्ष दिले गेले पाहिजे. पालकत्व म्हणजे केवळ संगोपन नाही; तर पालकांची प्रेरणादायी जबाबदारी असते. आपल्या पाल्याच्या सहवासात त्याला प्रेरित करणे, चांगले-वाईट वेळीच सांगणे, हे तितकेच महत्त्वाचे आहे. तुमच्या उज्ज्वल भवितव्याचे शिल्पकार तुम्हीच आहात, असेही त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.
दहावीच्या परिक्षेतील अंतिम टप्प्यात तयारी करताना हाती असलेले दोन महिने कौशल्यपूर्वक वापरले पाहिजेत. मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या आरोग्याकडेही पालकांंनी लक्ष द्यावे, असे चाटे शिक्षण समूहाच्या विभागीय मुख्य कार्यकारी अघिकारी एस. जे. पाटील यांनी सांगितले.
चाटे समूहाबद्दल बोलताना खराटे म्हणाले, या समूहातर्फे ज्युनिअर कॉलेज आॅफ सायन्स, हायस्कूल, प्ले ग्रुप व नर्सरी या शैक्षणिक सुविधांबरोबरच मेडिकल, जेइई मुख्य आणि आयआयटी- जेइई आदि परिक्षांची तयारी ही करून घेतली जाते.यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. पालक व विद्यार्थ्यांनी या शिबिराला उस्फूर्त प्रतिसाद दिला. दोन्ही सत्रात कार्यालय विद्यार्थ्यांनी खचाखच भरले होेते. खराटे सरांनी केलेले लाख मोलाचे मार्गदर्शन अंमलात आणायचे, हे मनोमन ठरवूनच पालक व विद्यार्थी सभागृहाबाहेर पडले. राजेंद्र घुले सर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)