भटक्या श्वानांशीही जडतंय जिव्हाळ्याचं नातं
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:25 IST2021-06-20T04:25:43+5:302021-06-20T04:25:43+5:30
पाचशे एक पाटी चौकापासून मंगळवार तळे या दरम्यान रात्री दहाच्या सुमारास सहज फेरफटका मारला तर एक आजीबाई डोक्यावर काहीतरी ...

भटक्या श्वानांशीही जडतंय जिव्हाळ्याचं नातं
पाचशे एक पाटी चौकापासून मंगळवार तळे या दरम्यान रात्री दहाच्या सुमारास सहज फेरफटका मारला तर एक आजीबाई डोक्यावर काहीतरी गाठोडं घेऊन चाललेली अनेकांनी पाहिलेली असेल. यात काय नवीन नव्हे. पण या आजीबाईंच्या भोवताली किमान दहा-बारा श्वानांची टोळी असते. मोरे कॉलनीतील या तलवाल बाई म्हणे सातारा पोलीस दलात सेवा बजावली. स्थानिक गुन्हे शाखा, पाटण पोलीस ठाण्यात त्या काही काळ कर्तव्यावर होत्या. त्यांच्या कुटुंबात कोणीही सदस्य नाही. मात्र,हे श्वानच त्यांचे जीवाभावाचे ठरत आहेत. या श्वानांची निगा राखली जात नसल्याने स्थानिकांचा त्यांच्या श्वान सांभाळण्याला विरोध होत आला आहे. पण त्यांची श्वानांवरील माया थोडीही कमी झालेली नाही.
त्याचप्रमाणे साताऱ्यातीलच जास्मीन अफगान यांच्या मनातही श्वानांविषयी प्रचंड कुतूहल आहे. त्यामुळे त्या परिसरातील भटक्या श्वानांना सांभाळण्यासाठी घरी आणतात. विशेष म्हणजे त्यांच्या इमारतीच्या वाहनतळात फारशी वाहने उभी केलेली नसतात. या जागेचा वापर श्वानांना थांबण्यासाठी केला जातो. याठिकाणी त्यांनी श्वानांना खाण्यासाठी, पिण्यासाठी पाण्याची सोय केलेली असते. त्यांच्याकडे कोणी आले तर त्यांच्यापासून इतर आजार पसरू नयेत म्हणून त्या श्वानांचे लसीकरण करतात. काही श्वानांना जखमी झाली असल्यास वैद्यकीय इलाज, प्रसंगी प्लास्टरही करून आणतात. जास्मीन यांची बेकरी आहे. बेकरीतील काही पदार्थ त्या श्वानांना हमखास खाण्यासाठी आणतात.
- जगदीश कोष्टी
कोट :
भटके श्वानही आपल्या मातीतील आहेत. त्यांना आपण हुसकावून लावतो आणि परदेशी श्वान आपण सांभाळण्यास आणतो. त्यांचे लाड करतो. त्यांच्याविषयी आपुलकी दाखविण्यास हरकत नाही. पण या श्वानांना असेच सोडून देणे योग्य नाही.
- जास्मीन अफगान
चौकट :
लॉकडाऊनमध्ये माणुसकीचे दर्शन
कोरोनाची शिरकाव झाला अन् प्रशासनाने जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर केला. यामुळे अनेकांचे रोजगार बुडाले, व्यवसाय बसल्याने कित्येकांची उपासमार झाली, अशी ओरड माणसांमधून सतत होती. पण याला अपवाद मुके जीवही नव्हते. सर्वसाधारण वातावरण असते तेव्हा साताऱ्यातील मध्यवर्ती बसस्थानक, राजवाडा चौपाटी, राजपथ, खालचा रस्ता परिसरात हातगाडे लागलेले असतात. तेथील व्यावसायिक शिल्लक राहिलेले अन्न टाकतात. त्यावर श्वानांचे पोट भरत होते. पण लॉकडाऊन सुरू झाले अन् रस्त्यावर कोणीच दिसत नव्हते. श्वानांना खायलाही काही मिळत नव्हते. त्यामुळेच या काळात श्वान टोळक्यांनी दिसायचे. ही बाब लक्षात आल्यावर काही नागरिक घरातून काहीतरी खाण्यासाठी आणून श्वानांना टाकत होते. यातून माणुसकीचे दर्शन घडले.
फोटो प्रगती मॅडम देणार आहे...
साताऱ्यातील जास्मीन अफगान यांनी इमारतीच्या वाहनतळात भटक्या श्वानांना सांभाळले आहे.