रसिकांसमोर उलगडणार ‘नटखट’चे अंतरंग!
By Admin | Updated: January 23, 2015 00:39 IST2015-01-22T23:51:00+5:302015-01-23T00:39:16+5:30
रंगकर्मींना बाळकडू : अभिनेते मोहन जोशी यांची आज साताऱ्यात प्रकट मुलाखत

रसिकांसमोर उलगडणार ‘नटखट’चे अंतरंग!
सातारा : ‘नशीबवान’ चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना त्यांचा टेम्पोचा व्यवसाय होता. पुण्याहून भाडं घेऊन ते सातारला आले. शूटिंग केलं आणि पुन्हा भाडं घेऊन पुण्याला गेले... हा किस्सा आहे प्रथितयश अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष मोहन जोशी यांचा. त्यांच्या जीवनातल्या अशा असंख्य अनुभवांची पोतडी सातारकरांसमोर उलगडणार आहे शुक्रवारी यासंकाळी सहा वाजता. कलावंतालाही अनेकदा वेगवेगळे व्यवसाय करावे लागतात. मी कलावंत आहे म्हणजे इतर व्यवसायांना हातही लावणार नाही, अशी भूमिका घेऊन चालत नाही, याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजेच मोहन जोशी. नाट्य परिषदेच्या सातारा शाखेतर्फे ‘समर्थ’ एकांकिका स्पर्धेचा प्रारंभ मोहन जोशींच्या हस्ते सायंकाळी साडेपाच वाजता दीपप्रज्वलनानं होईल. त्यानंतर सहा वाजता त्यांची प्रकट मुलाखत होणार असून, एकांकिका सादर करण्यापूर्वीच रंगकर्मींना आयुष्याच्या रंगभूमीचं असं बाळकडू मिळणार आहे. ‘नटखट’ हे मोहन जोशींचं आत्मचरित्र नुकतंच प्रकाशित झालंय. त्यात त्यांनी त्यांचा संपूर्ण प्रवास मांडला आहे. अशा संवेदनशील, अवलिया कलावंताचे अंतरंग उलगडणारी, प्रत्येक कलावंताला मार्गदर्शक ठरणारी ही मुलाखत राजेश दामले घेणार आहेत. मुलाखतीनंतर ‘समर्थ’ एकांंकिका स्पर्धांना प्रारंभ होणार असून, शुक्रवारी नऊ एकांकिका सादर होणार आहेत. नाट्य रसिकांना शनिवारी (दि. २४) आठ, तर रविवारी (दि. २५) नऊ एकांकिका सादर होतील. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, डोंबिवली, वाईसह सातारच्या स्थानिक संस्थांचे प्रयोग स्पर्धेत पाहता येणार आहेत. (प्रतिनिधी) नाना पाटेकर आज भुर्इंजमध्ये भुर्इंज : किसन वीर कारखान्याच्या कार्यस्थळावर २३ ते २५ जानेवारी कृषी व पुष्पप्रदर्शन आयोजित केले आहे. नामयज्ञ सोहळ्याच्या तपपूर्तीनिमित्त यंदा अल्ट्रा हायडेन्सिटी पद्धतीने एक हजार दोनशे आंबा रोपांची लागवड करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे उद््घाटन अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते शुक्रवारी सकाळी दहा वाजता होणार आहे, अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी दिली. यावेळी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रमोद यादव, निवासी उपजिल्हाधिकारी संजय देशमुख, उपजिल्हाधिकारी (रोहयो) पराग सोमण यांच्यासह विविध मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत.