Interstate gang of diesel thieves exposed | डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

शिरवळ : शिरवळ हद्दीमध्ये महामार्गालगत असणाऱ्या पार्किंगमध्ये लावलेल्या मालट्रकमधून डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या मुंबई येथील आंतरराज्य टोळीचा पाठलाग करीत पर्दाफाश करण्यात शिरवळ पोलिसांना यश आले. यामध्ये एकाला पकडले असून, तिघे अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. संबंधितांकडून कार व १४० लिटर डिझेलसह ५ लाख ७५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

शिरवळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिरवळ हद्दीमध्ये शिरवळचे पोलीस हवालदार दत्तात्रय धायगुडे, पोलीस हवालदार छगन शेडगे हे रात्रगस्त करीत असताना, एका हॉटेललगत असणाऱ्या महामार्गाच्या पार्किंगमध्ये दोन मालट्रक उभे होते. संबंधित मालट्रकजवळ संशयास्पदरित्या काही व्यक्ती फिरताना दिसून आल्याने डिझेल चोरत असल्याचा संशय आला. हवालदार दत्तात्रय धायगुडे, छगन शेडगे यांनी त्याठिकाणी वाहन नेले असता, त्याठिकाणाहून संबंधितांनी घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी चोरट्यांनी त्याठिकाणी आणलेल्या कार (एमएच ४३ बीए २३२२) मधून पळून जाण्याचा प्रयत्न केला.

हवालदार धायगुडे व शेडगे यांनी चित्रपटाला शोभेल असा साधारणपणे दोन किलोमीटर संबंधित कारला महामार्गालगत एका बाजूला दाबत, तर छगन शेडगे यांनी कारच्या काचेवर प्रहार करीत कारचालक संतोष विठ्ठल पारिस्कर (वय ३८, रा. बनकोडेगाव झोपडपट्टी, कोपरखैरने, नवी मुंबई) याला ताब्यात घेतले, तर गजानन विठ्ठल खंडारे, विकी विजू खंडारे, ओम्या गजानन खंडारे (तिघे रा. बनकोडेगाव झोपडपट्टी, कोपरखैरने, नवी मुंबई) हे अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाले.

यावेळी संतोष पारिस्कर याला ताब्यात घेत अटक केली. मालट्रक (एमएच १४ एचजी ८१८५) व (जिजे १५ एक्सएक्स ३०००) मधील चोरलेले डिझेलसह कारमधून डिझेल चोरीचे साहित्य, १४० लिटर डिझेल, दोन मोबाईल, कारसह अंदाजे ५ लाख ७५ हजार ४८० रुपयांचा मुद्देमाल शिरवळ पोलिसांनी जप्त केला आहे.

संतोष पारिस्कर याची पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयासमोर उभे केले असता, न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. संबंधित चोरटे हे सराईत गुन्हेगार असून, संबंधितांवर महाराष्ट्रातील विविध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. पोलीस हवालदार जितेंद्र शिंदे तपास करीत आहे.

चौकट -

कार भाडेतत्त्वावर घेत कारनामे

शिरवळ येथे डिझेल चोरीचा प्रयत्न करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांच्या कारनाम्याची कहाणी ऐकल्यानंतर शिरवळ पोलीसही चक्रावले. संबंधित चोरटे हे मुंबईमधून कार भाडेतत्त्वावर घेत संबंधित कारमालकांना ठराविक भाडे देत डिझेल चोरीचा उद्योग करीत असल्याचे तपासामध्ये निष्पन्न झाले.

फोटो

शिरवळ पोलिसांनी पाठलाग करून डिझेल चोरीप्रकरणात ही कार ताब्यात घेतली. (छाया : मुराद पटेल)

Web Title: Interstate gang of diesel thieves exposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.