सातारा : जिल्ह्यातील प्रत्येक मतदार ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, त्याचा फैसला रविवार (दि. १९) होणार आहे. आठही विधानसभा मतदारसंघांचा नवीन आमदार कोण असेल, याची निश्चिती दुपारी एक वाजेपर्यंत निश्चित होणार आहेत. दरम्यान, ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे, तेथे कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला असून, काही ठिकाणी वाहतुकीत बदल केला आहे. निकालानंतर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस दलही सतर्क असून, मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघांत बुधवार, दि. १५ रोजी ८७ उमेदवारांचे नशीब मतदानयंत्रात बंद झाले. कऱ्हाड दक्षिण, पाटण, माण, कोरेगाव या प्रमुख मतदारसंघांत प्रस्थापित उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे येथील लढती लक्षवेधी राहिल्या. प्रचारकाळात बहुतांशी मतदारसंघात ‘लक्ष्मीदर्शना’ची चर्चा रंगली.प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सकाळी आठ वाजता पोस्टल मतांची आणि नंतर फेरीनिहाय मतमोजणी सुरू होणार आहे. प्रत्येक मतमोजणी केंद्रावर १४ टेबल मांडण्यात आले असून, सरासरी २२ ते ३२ फेऱ्या होणार आहेत. (प्रतिनिधी)
जिल्ह्यात निकालाची उत्सुकता शिगेला
By admin | Updated: October 18, 2014 23:26 IST