कागलमधील सर्वच पात्र शेतकऱ्यांना व्याज परतावा
By Admin | Updated: December 2, 2015 00:35 IST2015-12-01T22:16:45+5:302015-12-02T00:35:45+5:30
कुमार मोरबाळे : २० हजार शेतकऱ्यांना पावणेतीन कोटींचा लाभ

कागलमधील सर्वच पात्र शेतकऱ्यांना व्याज परतावा
म्हाकवे : डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून दिली जाणारी व्याज सवलत गेल्या तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. याबाबत हमीदवाडा (ता. कागल) येथील सामाजिक कार्यकर्ते कुमार मोरबाळे यांनी थेट राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याकडे २० जुलै रोजी तक्रार केली होती. राज्यपालांनीही या तक्रारीची गंभीर दखल घेत कृषी व सहकार मंत्रालयाकडे याबाबत कार्यवाहीच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे कागल तालुक्यातील २० हजार १६० शेतकऱ्यांना २ कोटी ७४ लाख ५ हजार रुपये येत्या चार दिवसांत संबंधित बँक खात्यावर जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ही माहिती शेतकऱ्यांना थकीत व्याज रक्कम मिळण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा करणारे कुमार मोरबाळे यांनी पत्रकाद्वारे दिली आहे. या व्याज सवलत योजनेंतर्गत एक वर्षाच्या मुदतीत पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना एक लाख रुपयांपर्यंत ४ टक्के व्याज सवलत शासन देऊ शकते. मात्र, शासनाने गेल्या तीन वर्षांपासून ही व्याजाची रक्कम दिलेली नाही. परंतु, प्रत्यक्षात सेवा संस्था, बँकांनी व्याजाचीही वसुली शेतकऱ्यांकडून करून घेतली आहे. त्यामुळे ही व्याज रक्कम मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांत कमालीची उत्सुकता होती. (वार्ताहर)
अद्याप जिल्ह्याला निधीची गरज--जिल्ह्यातील शेतकऱ्यांना व्याज परतावा देण्यासाठी सुमारे २५ कोटी रुपयांची गरज आहे. मात्र, राज्य शासनाकडून ८ कोटी व नियोजन समितीकडून साडेचार कोटी रु. असे साडेबारा कोटी रुपये आले आहेत. त्यातील कागल तालुक्याला पावणेतीन कोटी मिळणार असल्याने कागलमधील प्रतीक्षेत असणाऱ्या सर्वच शेतकऱ्यांच्या पदरी व्याज परताव्याची रक्कम पडणार आहे. तर जिल्ह्याला अद्याप सुमारे साडेबारा कोटी रुपयांची गरज असून, जिल्ह्यातील सर्वच शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेपर्यंत पाठपुरावा सुरूच ठेवण्याचा निर्धारही मोरबाळे यांनी केला.