जिल्हा साथरोग नियंत्रणाकडून रणदुल्लाबादेत पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:04+5:302021-08-26T04:42:04+5:30

पिंपोडे बुद्रुक : रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) या ठिकाणी गेल्या आठवड्यात काही दिवसांच्या फरकाने साथरोगामुळे दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य प्रशासन ...

Inspection by District Infectious Diseases Control at Randullabad | जिल्हा साथरोग नियंत्रणाकडून रणदुल्लाबादेत पाहणी

जिल्हा साथरोग नियंत्रणाकडून रणदुल्लाबादेत पाहणी

पिंपोडे बुद्रुक : रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) या ठिकाणी गेल्या आठवड्यात काही दिवसांच्या फरकाने साथरोगामुळे दोन रुग्णांच्या मृत्यूनंतर आरोग्य प्रशासन दक्ष बनले असून, जिल्हा साथरोग नियंत्रण विभागाने संबंधित गावात जाऊन परिसराची पाहणी व तपासणी केली. तत्पूर्वी ग्रामपंचायत प्रशासन व वाठार स्टेशन प्राथमिक आरोग्य विभागांनी चोख प्रतिबंधक कार्यवाही करत लोकांमध्ये साथरोग फैलाव प्रतिबंध याविषयी प्रबोधन केल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथे रविवार, दि. २३ रोजी डेंग्यूसदृश साथरोगाने एका ३४ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसारित झाल्याने जिल्हा साथरोग नियंत्रण पथकाने तात्काळ रणदुल्लाबाद येथे जाऊन परिसराची पाहणी, तपासणी केली. यावेळी जिल्हास्तरीय विस्तार अधिकारी गिरीश कुलकर्णी, साथरोग नियंत्रण आरोग्य सहायक श्रीधर जाधव, सरपंच मंगेश जगताप, ग्रामसेवक राजेश आहिरेकर, आशा व आरोग्य सेविका यांनी परिसरातील डास उत्पत्ती साधने यांची पाहणी केली. तत्पूर्वी ग्रामपंचायत प्रशासन व स्थानिक आरोग्य प्रशासनाने या ठिकाणी विशेष खबरदारी घेत परिसर औषध फवारणी, स्वच्छता व प्रबोधन केल्याने साथरोग नियंत्रण होण्यास मदत झाली होती.

दरम्यान, तूर्तास तरी परिसरात साथरोग नियंत्रित असून, नागरिकांनी तसेच स्थानिक डॉक्टरांनी विशेष खबरदारी घेत प्रशासनाला योग्य सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हास्तरीय विस्तार अधिकारी गिरीश कुलकर्णी, सहायक श्रीधर जाधव व सरपंच मंगेश जगताप यांनी केले आहे.

२५पिंपोडे बुद्रुक

रणदुल्लाबाद (ता. कोरेगाव) येथे परिसर तपासणी करताना जिल्हास्तरीय विस्तार अधिकारी गिरीश कुलकर्णी, सरपंच मंगेश जगताप, ग्रामसेवक राजेश आहिरेकर, आशा व आरोग्य सेविका उपस्थित होत्या.

Web Title: Inspection by District Infectious Diseases Control at Randullabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.