वरकुटेत पक्षिमित्राकडून जखमी कोकिळेला जीवदान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:27 IST2021-06-05T04:27:33+5:302021-06-05T04:27:33+5:30
वरकुटे-मलवडी : दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड आणि आधुनिकीकरणामुळे वाढत चाललेले शहरीकरण व काँक्रिटीकरण, वाहनांच्या प्रदूषणामुळे दूषित झालेले वातावरण, यामध्ये किलबिल ...

वरकुटेत पक्षिमित्राकडून जखमी कोकिळेला जीवदान...
वरकुटे-मलवडी :
दिवसेंदिवस होणारी वृक्षतोड आणि आधुनिकीकरणामुळे वाढत चाललेले शहरीकरण व काँक्रिटीकरण, वाहनांच्या प्रदूषणामुळे दूषित झालेले वातावरण, यामध्ये किलबिल करणाऱ्या चिमण्यांसह इतर पक्ष्यांचीही संख्या घटत चालली असतानाच वरकुटे-मलवडीत पक्षी आणि कावळ्यांच्या हल्ल्यात जखमी झालेली कोकिळा निदर्शनास येताच पक्षिमित्र रणजित चव्हाण यांनी त्यास जीवदान दिले.
यशवंतराव चव्हाण हायस्कूलमध्ये लोकसहभागातून सुरू असलेल्या संकल्प कोविड सेंटरमध्ये गेल्या महिन्यापासून रणजित चव्हाण हे स्वयंसेवक म्हणून काम करतात. ते औषधे खरेदीसाठी मेडिकलमध्ये गेले असता, महादेव मंदिराजवळ रस्त्यावर अनेक पक्षी मिळून एका कोकिळेला मारत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. क्षणाचाही विलंब न लावता तत्काळ त्यांंनी पक्ष्यांना हाकलून देत रक्तबंबाळ झालेल्या कोकिळेला अलगद उचलून सुटका केली. पंख तुटून रक्ताने माखलेल्या कोकिळेला घेऊन ते कोविड सेंटरला कामावर हजर राहिले. त्यानंतर त्यांनी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित भांगे यांना फोनवरून माहिती देऊन बोलावून घेतले. जखमी कोकिळेवर उपचार करून दाणापाणी मिळाल्याने त्यास जीवदान मिळाले आहे. रणजित चव्हाण यांची सहृदयता पाहून सर्वांनी त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. कोकिळा हा पक्षी आपल्या सुमधुर वाणीतून 'कुहूकुहू' आवाज ऐकवत असतो. मात्र पक्ष्यांची संख्या घटल्याने दिवसेंदिवस हा आवाज लोप पावत चालला आहे.
(कोट)
मला मुळातच निसर्गाबद्दल प्रेम आहे आणि पशुपक्ष्यांची आवड असून, यांच्याबद्दल आस्था वाटते. माझा जन्म जरी शिकार करणाऱ्या रामोशी कुळात झाला असला तरी, मी नेहमी निष्पाप आणि मुक्या प्राण्यांवर मनापासून प्रेम केले आहे.
- रणजित चव्हाण, पक्षिमित्र, वरकुटे-मलवडी
०४वरकुटे मलवडी
फोटो : जखमी कोकिळेवर उपचार करताना डॉ. रणजित भांगे आणि पक्षिमित्र रणजित चव्हाण.