स्मार्टकार्डवर ऊस नोंदीची माहिती
By Admin | Updated: November 8, 2015 23:41 IST2015-11-08T20:46:26+5:302015-11-08T23:41:56+5:30
किसन वीर कारखाना : सभासदांच्या हितासाठी आधुनिकीकरणाचे आणखी एक पाऊल

स्मार्टकार्डवर ऊस नोंदीची माहिती
भुर्इंज : ‘किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाने सभासदांना गतिमान सेवा-सुविधा देताना आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. कारखाना कार्यस्थळावरील साखर भवनात एटीएम मशीनसारखेच किआॅस मशीन कार्यान्वित करून हे मशीन सभासदांसाठी खुले केले आहे. कारखान्याच्या सभासदांना त्यांना दिलेल्या स्मार्टकार्डच्या आधारे सर्व माहिती एका बटणावर उपलब्ध होणार आहे,’ अशी माहिती अध्यक्ष मदन भोसले यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
पत्रकात म्हटले आहे की, संचालक मंडळाने सभासदहित नजरेसमोर ठेवून गेल्या बारा वर्षांत कारखान्याचा कारभार करताना आधुनिक व नवतंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्याअंतर्गत कारखान्याच्या सर्व विभागाचे संगणकीकरण, अॅण्ड्रॉइड मोबाईलद्वारे ऊस नोंदणी, एसएमएसद्वारे नियोजित कार्यक्रमांची माहिती, अद्ययावत साखर भवन, सर्व सभासदांना स्मार्टकार्ड आदी आधुनिक सेवा-सुविधा पुरविण्यात आलेल्या आहेत.
आता कारखान्याने दिलेल्या स्मार्टकार्डचा वापर बँकेच्या एटीएम मशीनसारख्याच किआॅस मशीनवर करून कारखान्याच्या सभासदांना त्यांच्या उसाची नोंद, टनेज, ऊसबिल, शिल्लक साखर, शेअर्स व ऊस विकासाच्या विविध योजनांची माहिती मिळणार आहे.
शिवाय या मशीनवरच सभासदांना आपल्या स्कार्टकार्डवरील माहिती अद्ययावत करून घेणे शक्य होणार आहे. तसेच हवी असलेली माहिती प्रिंट करून घेण्याची सुविधाही या मशीनमध्ये आहे.
कारखान्याच्या सर्व सभासद बांधवांनी स्मार्टकार्डचा वापर कार्यस्थळावरील किआॅस मशीनवर करून त्याच्या आधारे आपल्याला हवी असलेली माहिती घ्यावी, स्मार्टकार्डवरील आपली माहिती अद्ययावत करावी, असे आवाहनही माजी आमदार मदन भोसले यांनी केली आहे.
अनेक साखर कारखान्यांतील सभासदांना आवश्यक ती माहिती मिळत नाही. त्यामुळे अनेकवेळा कारखान्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात. किसन वीर साखर कारखान्याने सभासदांच्या हितासाठी आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत.
स्मार्टकार्ड आणल्यामुळे एका क्लिकवर कारखान्याची माहिती व ऊस नोंदी पाहायला मिळणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ व पैसा वाचणार आहे. अशा भावना किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या अनेक सभासदांनी यावेळी व्यक्त केल्या आहेत. (प्रतिनिधी)
सारं काही एका क्लिकवर
बळीराजाचा विकास करायचा असेल तर त्याला बदलत्या काळानुसार तंत्रज्ञानाची जोड देणे गरजेचे आहे. हे ओळखून किसन वीर साखर कारखान्याने आजवर अनेक उपक्रम राबविले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून कारखान्याच्या सभासदांना स्मार्ट कार्ड देण्यात आले आहे. या कार्डमुळे सर्व माहिती एका बटनावर मिळणार असल्याने वेळ आणि पैसा वाचणार आहे.