महागाईच्या झळांनी सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:42 IST2021-08-26T04:42:07+5:302021-08-26T04:42:07+5:30
कुडाळ : अनलॉक झाल्यावर आता हळूहळू उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत; मात्र कोरोना काळात वाढलेला महागाई टक्का काय ...

महागाईच्या झळांनी सर्वसामान्यांचा जीव मेटाकुटीला
कुडाळ : अनलॉक झाल्यावर आता हळूहळू उद्योग, व्यवसाय पूर्वपदावर येऊ लागले आहेत; मात्र कोरोना काळात वाढलेला महागाई टक्का काय फारसा कमी झाला नाही. जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीही वधारलेल्याच आहेत. इंधन दरवाढ गगनाला भिडू लागली आहे. यामुळे सर्वसामान्यांचा जीव अगदी मेटाकुटीला आला आहे.
कोरोनाच्या परिस्थितीत अनेकांचे रोजगार गेले, अनेक व्यवसाय ठप्प झाले. अशातच आता वाढत्या इंधन दरवाढीचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवरही पाहायला मिळत आहे. यामुळे जगण्यासाठी सर्वसामान्यांना संघर्ष करावा लागत आहे. आता घरातील जेवणालाही महागाईची चरचरीत फोडणी बसली. घरगुती गॅसच्या किमती हजारीकडे पोहोचल्या आहेत. गोरगरीब जनतेला गॅस घेणे परवडणारे नाही. यामुळे ग्रामीण भागात पुन्हा चुली पेटल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जानेवारीपासून जवळपास ३०० रुपयांची गॅसदरवाढ झाली आहे. खाद्यतेल, डाळीच्या किमतीचा वाढता आलेख होता; मात्र यात काहीशी घट झालेली असली तरी सध्याचा दर जास्तीचाच आहे. कडधान्य आणि डाळींच्या दराबाबतही काहीशी अशीच परिस्थिती आहे. यामुळे गरिबाघरी अन्नाचा घासही कडू वाटू लागला आहे.
पेट्रोलच्या वाढीने शतक पार केले असून, डिझेल शंभरीच्या उंबरठ्यावर आहे. यामुळे वाहतूक खर्चात वाढ होऊन वस्तूंच्या किमतीही वाढत आहेत. सध्या प्रत्येकाच्या घरात दुचाकी वाहने पाहायला मिळतात. गतिमान जीवनात याचा पुरेपूर उपयोग होत आहे; मात्र पेट्रोल, डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे आता वाहन चालवणेही खिशाला परवडत नसल्याची सर्वसामान्यांनी खंत व्यक्त केली आहे. याकरिता गॅस व इंधनाच्या किमती आटोक्यात आणाव्यात आणि महागाई कमी व्हावी, अशी नागरिकांची भावना आहे.
(चौकट)
स्वयंपाकाचा गॅसही आता हजारीकडे...
गेल्या काही महिन्यांपासून पेट्रोल, डिझेलच्या दरवाढीने तर उच्चांक गाठला आहे. याचा परिणाम जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर होत असून, त्यात वाढ झालेली आहे. महागाई वाढत असून, याची सर्वसामान्यांना अधिक झळ पोहोचत आहे. स्वयंपाकाचा गॅसही आता हजारीकडे पोहोचला आहे. पेट्रोल, डिझेल दरवाढीने महागाईचा टक्का वाढला आहे. सर्वांनाच याचा फटका बसत आहे. यामुळे कोरोना काळात जगण्यासाठीचा संघर्ष असताना महागाईने मात्र बिकट अवस्था झाली आहे.