पळशीत वाड्या-वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:39 IST2021-05-10T04:39:11+5:302021-05-10T04:39:11+5:30
पळशी : माण तालुक्यातील पळशी गाव व परिसरात कोरोना वेगाने पसरत असून, रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. आठवडाभरापासून ...

पळशीत वाड्या-वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव
पळशी : माण तालुक्यातील पळशी गाव व परिसरात कोरोना वेगाने पसरत असून, रोज नव्या रुग्णांची भर पडत आहे. आठवडाभरापासून गाव बंद असून देखील रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. आता तर वाड्या-वस्त्यांवर कोरोनाचा शिरकाव झाला असून माळीखोरा येथे एकाच कुटुंबातील तीन व्यक्ती बाधित आढळल्याने त्यांना येथील जिल्हा परिषद शाळेत विलगीकरणात ठेवले आहे.
माळीखोरा येथील वाड्या-वस्त्यांवर रुग्ण आढळल्याने वस्त्यांवर शुकशुकाट जाणवत आहे. येथील लोकसंख्या जवळपास दीड ते दोन हजार असून ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. सध्या शेतीची मशागतीची कामे सुरू असून, रुग्ण सापडल्याने शेतात जाण्यासही कोणी धजावत नसल्याने शेतीची कामेही खोळंबली आहेत. माळीखोरा परिसरात मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात असून, भीतीमुळे मजुरीवरही कोणी जात नाही. त्यामुळे आर्थिक अडचणींचा सामना अनेकांना करावा लागत आहे.
सध्या शेतात पिके नसल्याने मोकळ्या जागेत जनावरे चरण्यासाठी सोडली जात आहेत. पण भीतीमुळे शेतकरी शेतात न जाता घरीच जनावरांना असेल तो वाळलेला चारा घालत आहेत. त्यामुळे जनावरांची उपासमार होऊ लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून नजीकच्या मार्डी, पळशी गावात रुग्ण वाढत असल्याने दोन्ही गावे आठ दिवसांपासून बंद करण्यात आली असून, वाढता प्रसार रोखण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. किराणा मालासाठी वस्त्यांवरील लोकांना गावात जावे लागत असून, गावातील कोरोना आता वाड्या-वस्त्यांवर आढळून येत असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाच्यावतीने आवश्यक सूचना घरोघरी देण्यात आल्या आहेत.
चौकट
मोकाट कोरोना....
लॉकडाऊनमुळे पुणे-मुंबईतील लोक काही दिवसांपूर्वी गावी आले होते. पण काहीच दिवसांत गावातही रुग्ण वाढू लागले. त्यामुळे गाव सोडून ही सर्व मंडळी रानात वस्त्यांवर राहू लागली. पण आता वस्त्यांवरही एकाच कुटुंबात अनेकजण बाधित आढळू लागल्याने ग्रामस्थांमधून हतबलता व्यक्त होत आहे.
चौकट.
बाधित शौचास उघड्यावर....
सध्या माळीखोरा येथील जिल्हा परिषद शाळेत तीन बाधितांना ठेवण्यात आले असून, आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत. मात्र अंगणवाडी शौचालयाचे थोडेसे अंतिम काम अपूर्ण असल्याने त्यांना बाहेर जावे लागत आहे. संबंधितांनी लक्ष दिल्यास बाधितांची सोय होईल.
०९पळशी
फोटो
: माण तालुक्यातील पळशीतील माळीखोरा येथे कोरोनाबाधित आढळल्याने वस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे.