भरकटलेली एसटी कऱ्हाडात ताळ्यावर

By Admin | Updated: August 24, 2015 23:15 IST2015-08-24T23:12:30+5:302015-08-24T23:15:09+5:30

प्रांताधिकाऱ्यांची सूचना : स्थलांतराचा विषय थांबवा; अधिकाऱ्यांच्या बैठकीत सुरळीत वाहतुकीसाठी पोलीस उपअधीक्षकांचा ‘अ‍ॅक्शन प्लॅन’

Infected ST stranded | भरकटलेली एसटी कऱ्हाडात ताळ्यावर

भरकटलेली एसटी कऱ्हाडात ताळ्यावर

कऱ्हाड : ‘येथील बसस्थानकाच्या इमारत बांधकामामुळे व्यवस्थापनाने एसटीचे चार पर्यायी बसथांबे तयार करून त्याठिकाणी एसटी थांबविण्यास सुरुवात केली. बसस्थानक व्यवस्थापनाने आपल्या सोयीसाठी कोल्हापूर नाका येथे एसटी थांबविण्याचा केलेला प्रकार प्रवाशांच्या जीवावर बेतणारा तसेच वाहतूक विस्कळीत करणारा आहे. त्यामुळे आता हा बंद करा. एसटी कऱ्हाडातील मूळ बसस्थानकात आणा. त्यासाठी नियोजन करा,’ अशी सूचना प्रांताधिकारी किशोर पवार यांनी केली.
कऱ्हाड येथे शासकीय विश्रामगृहात सोमवारी बसस्थानक स्थलांतर व वाहतूक व्यवस्थेसंदर्भात शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. आमदार बाळासाहेब पाटील, प्रांताधिकारी किशोर पवार, पोलीस उपअधीक्षक राजलक्ष्मी शिवणकर, परिवहन अधिकारी स्टिव्हन अल्वारीस, तहसीलदार राजेंद्र शेळके, मुख्याधिकारी प्रशांत रोडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील, मलकापूरचे उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, कनिष्ठ अभियंता फय्याज मुल्ला, अभियंता प्रियांका काशीद, विभागीय वाहतूक अधिकारी के. टी. पाटील, सहायक पोलीस निरीक्षक ए. पी. सिद, सार्वजनिक बांधकामचे ए. एम. जाधव, रस्ते विकास महामंडळाचे ए. एस. दंडवते, आगारप्रमुख जे. के. पाटील आदींसह रिक्षा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रांताधिकारी पवार म्हणाले, ‘कऱ्हाड शहरात नवीन बसस्थानक झाल्यास प्रवासी व विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. मात्र, स्थानकाच्या बांधकामास प्रारंभ झाल्यापासून बसस्थानक अधिकाऱ्यांनी प्रवासी व विद्यार्थ्यांना वाऱ्यावरच सोडले आहे. बसस्थानकात जागा असूनदेखील स्थानक शहराबाहेर हलवून व्यवस्थापनाने चुकीचा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर नाका येथील राष्ट्रीय महामार्गलगत थांबा निर्माण करून प्रवाशांच्या मृत्यूस निमंत्रण देण्याचे काम एसटी प्रशासनाने केले आहे. त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पण, आता हे चालू देणार नाही. महामार्गावर एसटी थांबविण्याचा विषय कायमचा बंद करा.’
पोलीस उपअधीक्षक शिवणकर म्हणाल्या, ‘बसस्थानकाच्या स्थलांतरामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. बेशिस्त वाहतुकीवर कारवाई कधी करणार, अशी विचारणा त्यांच्याकडून केली जात आहे. बसस्थानक प्रशासनामुळे सर्वांनाच त्रास सहन करावा लागत आहे. पोलिसांनी सामान्य नागरिकांच्या प्रत्येक गोष्टींना किती दिवस तोंड द्यायचे. परिवहन अधिकारी, पोलीस अधिकारी व पालिका अधिकारी यांचे एक पथक तयार करून शहरातील बेकायदा रिक्षा थांबे, बसस्थानक परिसरातील अतिक्रमण यावर मंगळवारपासून कारवाई करणार आहे.’
यावेळी कृष्णा आॅटो रिक्षा संघटनेचे अध्यक्ष गफार नदाफ यांनी प्रशासनाचे आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Infected ST stranded

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.