शेड उभारून भूखंड बळकावण्याचा उद्योग
By Admin | Updated: July 16, 2015 20:42 IST2015-07-16T20:42:47+5:302015-07-16T20:42:47+5:30
ढेबेवाडीतील स्थिती : शासकीय जागा अतिक्रमणाच्या विळख्यात; प्रशासनाचे दुर्लक्ष

शेड उभारून भूखंड बळकावण्याचा उद्योग
सणबूर : ढेबेवाडी येथील नवीन गावठाणात बेकायदेशीरपणे बांधकाम किंवा शेड उभी करून शासकीय प्लॉट बळकाविण्याचे उद्योग सुरू आहेत. त्यामुळे संपूर्ण शासकीय गावठाण अतिक्रमणाच्या विळख्यात अडकले आहे. संबंधित विभाग मात्र गांधारीची भूमिका घेत असून, वाढत्या अतिक्रमणावर हातोडा घालणार कोण ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.ढेबेवाडी गावाची लोकसंख्या पाहता शासनाने ढेबेवाडी गावासाठी नवीन गावठाण उपलब्ध करून दिले. त्या गावठाणात मागणीनुसार शासनाने अनेक कुटुंबांना प्लॉट उपलब्ध करून दिले आहेत. शासनाच्या आदेशानुसार अनेकांनी त्याठिकाणी प्लॉट मिळविले व घरे उभी केली आहेत. मात्र, अनेकांनी शासनाच्या डोळ्यात धूळफेक करत त्या-त्या वेळच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना हाताशी धरून सरकारी भूखंड लाटण्याचा उद्योग केला आहे. संपूर्ण गावठाणात बेकायदेशीर अतिक्रमणांचा विळखा पडला आहे. अलीकडे वांग-मराठवाडी धरण प्रकल्पामुळे जागेचे दर गगनाला भिडले आहेत. त्यात ढेबेवाडीचा विस्तार विविध अंगाने वाढत चालला आहे. त्यामुळे ढेबेवाडीच्या आजूबाजूला वसाहती वाढत चालल्या आहेत. नवीन गावठाणात अनेकांनी बेकायदेशीर बांधकामे केली आहेत. तर अनेकांनी सरकारी जागेत पत्र्याची शेड उभी केली आहे. मात्र, संबंधित महसूल विभाग व ग्रामपंचायत याकडे कानाडोळा करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते करत आहेत. येथील पोलीस स्टेशनच्या बाजूच्या ग्राउंडमध्ये ढेबेवाडीतील अनेक कुटुंबांचे प्लॉट गेले आहेत. ती कुटुंबे आजही वाऱ्यावरच आहेत. मात्र त्यांची कुणाला खंत न परवा. मात्र स्वत:चे खिशे गरम करण्याच्या नादात अतिक्रमणाकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. अनेकांनी नवीन गावठाण स्वत:ची जहागिरी समजून गावठाणातील मोक्याच्या जागेवर शेड उभी केली आहेत. तर अनधिकृत बांधकामेही करण्यात आली आहेत. मात्र तरीही कोणतीच कारवाई होताना दिसत नाही.
त्यामुळे वाढत्या अतिक्रमणांवर अंकुश ठेवणार कोण? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. संपूर्ण नवीन गावठाणातील मोजणी करून अनधिकृत बांधकामे हटविण्याची मागणी ढेबेवाडीतील ग्रामस्थांतून होत आहे. (वार्ताहर)