उद्योग बहरले; पण पर्यावरण हरवले !

By Admin | Updated: July 15, 2015 21:15 IST2015-07-15T21:15:57+5:302015-07-15T21:15:57+5:30

खंडाळा तालुका : प्रशासनाची मात्र गांधारीची भूमिका ; अनेक कंपन्या सुरू झाल्या

Industry flourished; But the environment is lost! | उद्योग बहरले; पण पर्यावरण हरवले !

उद्योग बहरले; पण पर्यावरण हरवले !

दशरथ ननावरे - खंडाळा  तालुक्यात औद्योगिकीकरणात अलीकडच्या काळात मोठी वाढ झाली आहे. हजारो हेक्टर क्षेत्रात विस्तारलेल्या औद्योगिकीकरणाचा विळखा तालुक्याला पडला आहे. आर्थिक विकासाच्या मुद्द्याावर विकसित झालेल्या औद्योगिकीकरणाने पर्यावरणाचा मात्र पुरता ऱ्हास झाला आहे. पर्यावरणावर कोसळणारी कुऱ्हाड दिसत असूनही प्रशासनाने मात्र गांधारीची भूमिका घेतली आहे.
खंडाळा तालुक्यातील लोणंद, शिरवळ व खंडाळा परिसरात शासनाने औद्योगिक वसाहतीचे धोरण स्वीकारले व अंमलातही आणले. शेकडो कंपन्यांनी आपले बस्तान तालुक्यात बसविले आहे. त्यासाठी मिळविलेल्या जमिनीवरील झाडेझुडपे तोडून सपाटीकरण केले गेले. बहुतांशी ठिकाणी डोंगर-टेकड्या पोखरून जमीन सपाट करण्यात आली आहे. यामुळे वनस्पतींचे तर नुकसान झालेच आहे; पण जमीन, मातीचेही नुकसान होऊन पर्यावरण धोक्यात आले आहे.
खंडाळा तालुक्यात सुमारे १२ हजार हेक्टर क्षेत्र औद्योगिकीकरण वसाहतींसाठी अधिग्रहित करण्यात आले आहे. यामध्ये तालुक्यात चार टप्प्यांमध्ये अंदाजे सहाशे छोट्या-मोठ्या उद्योग कंपन्यांचा समावेश आहे. त्यापैकी पहिल्या दोन टप्प्यांतील कंपन्यांची उभारणी बऱ्यापैकी झाली आहे. शिरवळ, लोणंद परिसरात शंभराहून अधिक उद्योजकांनी आपले पाय रोवले आहेत. मात्र हे करत असताना उद्योग उभारणीचे सर्वच नियम धाब्यावर बसवले आहेत. कारखान्यांची उभारणी करताना किमान ३३ टक्के क्षेत्रांवर वृक्षलागवड करणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र ठराविक कंपन्या वगळल्या तर कुठेही पर्यावरणपूरक उपक्रम राबविल्याचे अथवा वृक्षलागवड केल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे तालुक्यातील पर्यावरण धोक्यात आले आहे.

कंपन्यातील धूर हानिकारक...\
लोणंद परिसरामध्ये काही कंपन्यांमधून बाहेर पडणारा धूर व त्यासोबत निघणारे धुलीकण हवेत पसरून नागरिकांना हानीकारक ठरत आहेत. काही कंपन्यांमधून बाहेर पडणारी दुर्गंधी, यामुळे हवेचे प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. परंतु, याकडे कंपनी प्रशासनाचेही लक्ष नाही आणि सरकारी अधिकाऱ्यांचेही नाही. त्रास मात्र सामान्य लोकांना सहन करावा लागत आहे. यापासून सुटका होण्यासाठी पर्यावरणाचे संतुलन राखणे व कारखान्यांनी प्रदूषणमुक्त उपक्रम राबविणे गरजेचे आहे. सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी हा काळ पोषक असल्याने किमान आता तरी कंपन्यांनी सामाजिक भावना लक्षात घेऊन वृक्षलागवड करावी, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे.


खंडाळा तालुक्यात अनेक कंपन्या उभ्या राहिल्या आहेत. औद्योगिक विकासासाठी शेतकऱ्यांनी जमिनी दिल्या; मात्र उद्योग उभारताना पर्यावरणाचा विचार न करता कारखाने उभारले आहेत. झाडे तोडली, जमिनी खणल्या गेल्या. त्यामुळे पर्यावरण धोक्यात आले आहे. याकडे शासकीय अधिकाऱ्यांनी डोळेझाकपणा केला आहे. कायद्याप्रमाणे पर्यावरण रक्षणाची जबाबदारी कंपन्यांनी घेतली पाहिजे.
-अभिजित खंडागळे, सामाजिक कार्यकर्ते

Web Title: Industry flourished; But the environment is lost!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.