२२५ रुपये वाढविले अन् केवळ १० रुपये कमी केले; व्वारे चलाखी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:39 IST2021-04-08T04:39:31+5:302021-04-08T04:39:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी म्हण आहे; पण सद्य:स्थितीत चुलीवरील स्वयंपाक कमी झाला असून त्या ...

२२५ रुपये वाढविले अन् केवळ १० रुपये कमी केले; व्वारे चलाखी !
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : ‘घरोघरी मातीच्या चुली’ अशी म्हण आहे; पण सद्य:स्थितीत चुलीवरील स्वयंपाक कमी झाला असून त्या जागी गॅस सिलिंडर आला. मात्र, सिलिंडर दर वाढत असल्याने चुलीवरील स्वयंपाक बरा म्हणण्याची वेळ आली आहे. कारण वर्षभरात सिलिंडर टाकीचा दर जवळपास २२५ रुपये वाढला; तर आता फक्त १० रुपये कमी केले. सततच्या दरवाढीने बजेट कोलमडले आहे.
पूर्वी घरोघरी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. एकत्र कुटुंब असले तरी घरातील महिलांना चुलीवरच अवलंबून राहावे लागत होते. कालांतराने विजेवरील शेगडी आली. तर मागील काही वर्षांपासून गॅसचा वापर होत आहे. शहरी भागात तर गॅसशिवाय पर्याय नाही. ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरचा वापर वाढला आहे. त्यासाठी केंद्र शासनाने योजनाही आणली; पण सिलिंडर टाकीचे दर सतत वाढत चालले आहेत. यामुळे घरखर्चाचा ताळमेळ बसविताना तारेवरची कसरतच करावी लागते.
मागील वर्षभराचा विचार केला तर जवळपास २२५ रुपयांची वाढ सिलिंडर टाकीमागे झाली आहे. ही वाढ टप्प्याटप्प्याने करण्यात आली. सद्य:स्थितीत १४ किलोंच्या सिलिंडर टाकीचा दर ८०० रुपयांच्या वर गेला आहे. पाच माणसांच्या कुटुंबाला एक सिलिंडर टाकी कशीबशी महिनाभरच जाते. त्यामुळे महिन्याला ८०० रुपये खर्च हा स्वयंपाक बनविण्यासाठीच करावा लागत आहे.
सिलिंडर टाकी दर
नोव्हेंबर २०२० ५९९
डिसेंबर २०२० ६९९
जानेवारी २०२१ ६९९
फेब्रुवारी २०२१ ७९९
मार्च २०२१ ८२४
एप्रिल २०२१ ८१४
चौकट :
मागील वर्षभरात अनेक वेळा सिलिंडर टाकीचे दर वाढले...
मागील पाच वर्षापूर्वीपर्यंत सिलिंडर टाकीचा दर हा ४०० रुपयांपर्यंत होता. मात्र, त्यानंतर सतत दर वाढत गेले. त्यामुळे मागील वर्षापर्यंत टाकीचा दर ६०० रुपयापर्यंत होता. पण, त्यानंतर वारंवार वाढ होत जाऊन ८२४ रुपयांपर्यंत गेला. मात्र, सध्या टाकीचा दर १० रुपयांनी कमी करण्यात आला. त्यामुळे ८१४ रुपयांना टाकी मिळत आहे. म्हणजेच वर्षात जवळपास २२५ रुपये दर वाढवून फक्त १० रुपये कमी केले आहेत.
कोट :
आता चुलीवरील स्वयंपाक कमी झाला आहे. यामुळे गॅस सिलिंडरवर अवलंबून राहावे लागत आहे. मात्र, सिलिंडर टाकीचा दर सतत वाढत चालला आहे. ही वाढ सामान्य कुटुंबासाठी परवडणारी नाही; कारण, खर्चाचा ताळमेळ घालताना तारेवरची कसरत करावी लागते. सामान्य कुटुंबासाठी तरी सिलिंडर टाकीचा दर कमी करण्यात यावा.
- पुष्पलता आटपाडकर, गृहिणी
.........
मागील काही वर्षांपासून सिलिंडर टाकीचे दर सतत वाढत चालले आहेत. त्यामुळे ८१४ रुपये आता द्यावे लागतात. एका कुटुंबासाठी एकच महिना सिलिंडर टाकी जाते. त्यामुळे दर महिन्याला टाकी घ्यावीच लागते. सतत वाढत जाणाऱ्या दरांमुळे खर्चामध्ये वाढच झालेली आहे. सिलिंडर टाकीचा दर कमी करावा.
- आशा काळे, गृहिणी
......................
वर्षभरात सिलिंडर टाकीचा दर जवळपास २०० रुपयांनी वाढला. त्यामुळे खर्चात वाढच झाली आहे. शासन एकीकडे गॅसबाबत आवाहन करते; तर दुसरीकडे सिलिंडर टाकीचे दर सतत वाढवत आहे. हे परवडणारे नाही. सामान्य कुटुंबासाठी अनुदानावर सिलिंडर टाकी देण्याची गरज आहे. तसा निर्णय घेण्यात यावा, हीच अपेक्षा आहे.
- राधा पाटील, गृहिणी
..................................