सोयाबीन खाद्यतेल दरामध्ये वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:55+5:302021-05-03T04:33:55+5:30
सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून, गत आठवड्यात मागणी वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात डब्यामागे ५० रुपयांची ...

सोयाबीन खाद्यतेल दरामध्ये वाढ
सातारा : मागील सहा महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर तेजीत असून, गत आठवड्यात मागणी वाढल्याने सोयाबीन तेलाच्या दरात डब्यामागे ५० रुपयांची वाढ झाली तर इतर खाद्यतेलांचा दर स्थिर राहिला. तसेच वाटाणा वगळता इतर पालेभाज्यांना भाव कमी मिळू लागला आहे. सातारा बाजार समितीत गुरुवारी आणि रविवारी भाज्यांची मोठ्या प्रमाणात आवक होते. यामध्ये कांदा, टोमॅटो आणि बटाटा अधिक प्रमाणात असतो. जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, वाई, जावळी, खटाव, फलटण या तालुक्यांतून शेतमाल येतो. तसेच पुणे जिल्ह्यासह इतर राज्यातूनही काही माल येतो. मागील काही दिवसात ही आवक कमी झाली आहे. सातारा बाजार समितीत रविवारी ६०६ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. यामध्ये कांदा १६९, बटाटा १०५, लसूण १६ आणि आल्याची ४ क्विंटल आवक राहिली. तसेच आंबा, चिकू, खरबूज, कलिंगड यांचीही आवक झाली. तरीही आंबा आणि कलिंगडाची आवक अधिक राहिली.
सोयाबीन तेल डबा २४००
खाद्यतेलाचे दर सध्या तेजीत आहेत. त्यामुळे शेंगदाणा व सूर्यफूल तेलांचे ग्राहक सोयाबीनकडे काही प्रमाणात वळले आहेत. सोयाबीन तेलाच्या डब्यामागे सरासरी ५० रुपयांची वाढ झाली आहे. सोयाबीनचा डबा २,४०० ते २,४५० रुपयांपर्यंत मिळत आहे. पामतेल २ हजार रुपये, सूर्यफूल २,५०० ते २,५५० आणि शेंगदाणा तेल डबा २,५५० ते २,७०० रुपयांपर्यंत मिळत आहे.
आंब्याची आवक वाढली
सातारा बाजार समितीत आंबा, कलिंगड, टरबूजची आवक होत आहे. या रविवारी आंब्याची २७ आणि कलिंगडाची ३६ क्विंटलची आवक झाली. द्राक्षाची आवक झाली नाही.
मिरची दर कमी
सातारा बाजार समितीत वांग्याला १० किलोला १०० ते १५० रुपये दर मिळाला, तर टोमॅटोला ८० ते १००, फ्लॉवर १०० ते १२०, दोडका २०० ते २५०, मिरचीला १०० ते १५० रुपये दर १० किलोला मिळाला. तर कांद्याला क्विंटलला १,२०० व लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळाला.
कोट :
कोरोनामुळे लॉकडाऊन आहे. ठराविक वेळेतच भाजीपाला खरेदी करावा लागतो. मंडई बंद आहेत. पेठेत विक्रेते येतात. त्यांच्याकडून खरेदी करतो. मंडईपेक्षा दर अधिक असतो.
- शामराव पवार, ग्राहक
गेल्या काही महिन्यांपासून खाद्यतेलाचे दर वाढले आहेत. दरात तेजी असल्याने सोयाबीन तेलाला मागणी आहे. त्यामुळे सोयाबीन तेलाच्या दरात वाढ झाली आहे. इतर तेलांचे भाव स्थिर आहेत.
- संभाजी आगुंडे, विक्री प्रतिनिधी
कोरोनामुळे लाॅकडाऊन असल्याने भाज्यांना मागणी कमीच आहे. बाजार समितीतही शेतमालाला दर कमी आहे. त्यामुळे उत्पादन खर्च तरी निघणार का, हा प्रश्न आहे.
- राजाराम पाटील, शेतकरी
फोटो जावेदचा कांद्याचा तीन काॅलम घ्यावा...