वाढत्या प्रदुषणामुळे नैसर्गिक तापमानात वाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:33 IST2021-02-08T04:33:43+5:302021-02-08T04:33:43+5:30
म्हसवड : ‘पृथ्वीवर दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. कोरोनासारख्या साथीचा ...

वाढत्या प्रदुषणामुळे नैसर्गिक तापमानात वाढ
म्हसवड : ‘पृथ्वीवर दिवसेंदिवस प्रदूषण वाढत आहे. त्यामुळे नैसर्गिक तापमानात बदल घडून निसर्गाचे संतुलन बिघडत आहे. कोरोनासारख्या साथीचा फैलाव वाढून व भविष्यात येऊ घातलेल्या महामारीपासून प्रत्येकाच्या आरोग्याला धोका संभवत आहे. हे प्रदूषण टाळण्यासाठी दुष्काळी भागातील माण-खटावमधील शेतकऱ्यांनी शासनाच्या अनुदानातून बांबूची लागवड करावी,’ असे आवाहन भाजपच्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष पाशा पटेल यांनी केले.
म्हसवड येथे चेतना सिन्हा यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माणदेशी फाऊंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा, माजी नगराध्यक्ष विजय सिन्हा, संजीव करपे, पार्थ सिन्हा उपस्थित होते.
पाशा पटेल म्हणाले, ‘शेतकऱ्यांनी बांबू पिकाची लागवड केल्यास एकरी एक लाख रुपये उत्पन्न मिळते. माण तालुका दुष्काळी आहे, या तालुक्यात ऊन्हाची तीव्रता अधिक असते. कमी पाऊस पडतो, त्यामुळे या दुष्काळी भागाला हमखास वरदान ठरणारे असे बांबू पीक आहे. वातावरणातील प्रदूषणात दिवसेंदिवस होत चाललेली वाढ चिंताजनक आहे. या भागातील हवेतील तापमान व प्रदूषणाची पातळी कमी करुन वातावरणाचा समतोल राखण्यासाठी या भागात मोठे असलेले जिराईत व पडीक क्षेत्रात पाणी उपलब्ध असो वा नसो बांबूची यशस्वीपणे लागवड करणेच योग्य असून, शेतकऱ्यांच्या फायद्याचे आहे. बांबूपासून किमती फर्निचर, टूथब्रश, कपडे, इथेलॉन, वाहनाला लागणारे किट अशा सुमारे एक हजार आठशे विविध वस्तू तयार करण्याचे प्रकल्प सुरु केलेले आहेत. केंद्र सरकारच्या योजनेतून प्रतिरोप लागवडीला १२० रुपये व अटल बांबू योजनेंतर्गत एका रोपाच्या लागवडीसाठी २७ रूपये याप्रमाणे हेक्टरी पाच लाखांचे अनुदान दिले जात आहे. ‘मनरेगा’मधूनही बांबू लागवड करण्यास सरकारने मंजुरी दिलेली आहे.