खटाव तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2021 04:38 IST2021-02-13T04:38:30+5:302021-02-13T04:38:30+5:30
पुसेगाव : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे होते. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची ...

खटाव तालुक्यात कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ !
पुसेगाव : जगातील अनेक देशांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे होते. त्या पार्श्वभूमीवर फेब्रुवारी महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता गृहित धरून राज्य शासनातर्फे प्रभावी उपाययोजना म्हणून प्रतिबंधात्मक उपायासाठी १० कलमी कार्यक्रम तयार करण्यात आला होता. राज्याच्या आरोग्य सेवेतील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम आखण्यात आला होता. जानेवारीपेक्षा फेब्रुवारी महिन्यात खटाव तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. नागरिकांनी विशेष काळजी घेणे गरजेचे असल्याचे स्पष्ट होत आहे.
हिवाळा आणि दिवाळीच्या सणानिमित्त होणाऱ्या भेटीगाठी, खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी, प्रवास आणि पर्यटन अशा अनेक कारणांमुळे दुसरी लाट येण्याचा धोका व्यक्त केला होता. परदेशातील कोरोना वाढीचा आलेख पाहता, राज्यात फेब्रुवारीच्या सुमारास दुसरी लाट शक्य असल्याचा अंदाज व्यक्त केला गेला. त्यादृष्टीने खबरदारी म्हणून हा १० कलमी कार्यक्रम राज्य शासनातर्फे आखला गेलेला आहे. आत्तापर्यंत खटाव तालुक्यातील विविध गावांमध्ये डिसेंबरअखेर सुमारे ४००८ कोरोना बाधित रुग्ण सापडले होते. जानेवारीत १३६, तर फेब्रुवारीच्या एक तारखेपासून शुक्रवार, दि. १२पर्यंत १६२ रुग्ण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यात वडूज व मांडवे येथील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे. ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. अशा पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोरोनाबाबत काळजी घेणे गरजेचे झाले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले. त्यानंतर पाचवीपासूनचे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. काही दिवसांत पदवीचे वर्ग सुरू होणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास कोरोना वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
कोट..
सध्या नागरिक कोरोनाबाबतीत योग्य ती काळजी घेत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी जसे गर्दी टाळणे, मास्कचा नेहमी वापर करणे, सॅनिटायझर वापरणे या गोष्टींची पुन्हा काटेकोरपणे अंमलबजावणी व पालन होणे गरजेचे आहे, कोरोना अजून गेलेला नाही, त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी.
-डॉ. युनूस शेख, तालुका वैद्यकीय अधिकारी, वडूज