सह्याद्रीच्या गाळपक्षमतेत वाढ
By Admin | Updated: May 27, 2014 01:24 IST2014-05-27T01:04:41+5:302014-05-27T01:24:15+5:30
बाळासाहेब पाटील यांचे प्रतिपादन

सह्याद्रीच्या गाळपक्षमतेत वाढ
मसूर : उसाच्या पट्टापद्धतीमुळे व ड्रीप इरिगेशनमुळे हेक्टरी उत्पादनात वाढ झाल्याने सह्यादी्र कारखान्याचा गळित हंगाम १८६ दिवस चालला. कारखान्याच्या दैनंदिन गाळप क्षमतेत वाढ झाली आहे. तरीही दिवसेंदिवस उसाच्या हेक्टरी उत्पादनात होणारी वाढ व वेळेत गळित हंगाम पूर्ण होण्यासाठी कारखान्याचा विस्तार करावा लागेल, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांनी केले. यशवंतनगर, ता. कºहाड येथे सह्याद्री साखर कारखान्याच्या ४० व्या गळीत हंगामाच्या सांगता कार्यक्रमात ते बोलत होते. कारखान्याचे उपाध्यक्ष भाऊसाहेब यादव, संचालक पांडूरंग पाटील, संभाजी गायकवाड, संजय थोरात, लालासाहेब पाटील, संजय जगदाळे, माणिकराव पाटील, शैलजा कणसे आदी संचालक, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संचालिका निर्मला चव्हाण व शहाजीराव चव्हाण यांच्या हस्ते गळीत हंगामाची सांगता झाली. आमदार पाटील पुढे म्हणाले, सद्या सहकारी साखर उद्योगासमोर अनेक अडचणी असून शिल्लक साखरेचे संकट सर्वच ठिकाणी आहे. पुढील हंगामासाठी कारखान्याकडे २२,४८३ हेक्टर ऊसाची नोंद झाली असून या हंगामात १३ लाख २८ हजार मे. टन ऊसाचे गाळप पूर्ण झाले आहे. ९५ लाख लिटर्स डिस्टलरी उत्पादन झाले असून सरासरी हेक्टरी उत्पादन १०३ टन इतके निघाले आहे. पुढील हंगाम वेळेत पूर्ण करण्यासाठी १ आॅक्टोंबरला हंगाम सुरू करण्याच्या दृष्टीने सर्व तयारी सुरू असल्याचे सांगून १५ लाख मे. टनाचे उद्दिष्ट ठेवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमास संचालक तानाजी जाधव, किशोर पाटील आदींसह पदाधिकारी, कर्मचारी, ऊस वाहतुकदार, तोडणी यंत्रणेचे कामगार, ऊस उत्पादक शेतकरी, कत्रांटदार आदी उपस्थित होते. प्रास्ताविक कार्यकारी संचालक सी. एन. अहिरे यांनी केले. आभार भाऊसाहेब यादव यांनी मानले. (प्रतिनिधी)