वीस गुंठ्यातील ढोबळीतून सहा लाख रुपयांचे उत्पन्न!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:15 IST2021-02-06T05:15:34+5:302021-02-06T05:15:34+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : बाजारपेठेचा अभ्यास करुन शेती केली तर फायद्याचीच ठरते हे सिध्द केलंय ते वाई तालुक्यातील ...

वीस गुंठ्यातील ढोबळीतून सहा लाख रुपयांचे उत्पन्न!
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : बाजारपेठेचा अभ्यास करुन शेती केली तर फायद्याचीच ठरते हे सिध्द केलंय ते वाई तालुक्यातील भुईंजच्या रमेश ससाणे या शेतकऱ्याने. अवघ्या २० गुंठे क्षेत्रातील शेडनेटमधील रंगीत ढोबळी मिरचीतून त्यांनी दोन लाख मिळविले असून आणखी चार लाख मिळण्याचा अंदाज आहे. तर ते इतर पिकेही अभ्यास करुनच घेतात. त्यामुळे तोट्याचे गणित शक्यतो त्यांच्या वाट्यालाच नाही.
शेती व्यवसाय हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा आहे. हे कोरोना महामारीच्या काळात पुन्हा सिद्ध झाले आहे. कारण, सर्व देश लॉकडाऊन होता. रस्ते थांबले होते. सगळी चाकं जाम होती. पण, शेतकरी पोशिंद्याच्या भूमिकेत होता. महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याने तर या कोरोना काळात उत्तम नियोजन करुन प्रत्येकाच्या घरात भाजी जाईल हे पाहिले. त्याला सातारा जिल्हाही अपवाद नव्हता.
सातारा जिल्ह्यातील भाजीपाला अगदी मुंबई, पुणे, कोकणातही जातो. आता तर राज्य शासनाच्या ‘विकेल ते पिकेल’ या योजनेंतर्गत शेतकरी आणि ग्राहक एकत्र येत आहेत. अशाचप्रकारे भुईंज येथील विविध प्रयोग करणारे शेतकरी रमेश बळवंत ससाणे. त्यांच्या संयुक्त कुटुंबाची एकूण ३० एकर शेती आहे. या शेतीमध्ये ते ऊस, आले, हळद अशी पिके घेतात. त्याचबरोबर २० गुंठ्यांची प्रत्येकी दोन शेडनेट आहेत. यातील एका शेडमध्ये काकडी होती. ऐन लॉकडाऊनमध्येच ही काकडी तोडणीस आली. त्यामुळे दराचा फटका बसला. पण, तरीही सरासरी १५ रुपये किलो दर मिळाल्याने साडेचार लाखांचे उत्पन्न मिळाले. तर २ लाख खर्च आलेला. लॉकडाऊन नसता तर उत्पन्नाचे गणित आणखी वाढले असते.
दुसऱ्या २० गुंठ्याच्या शेडनेटमध्ये ढोबळी मिरची आहे. यामधून आतापर्यंत ६ टन उत्पन्न मिळाले आहे. तर आणखी १० टन उत्पन्नाचा अंदाज आहे. त्यातच ही रंगीत मिरची असल्याने दर अधिक मिळतोय. सुरूवातीला ४० रुपयांपर्यंत दर मिळाला. पण, आता मुंबईच्या मार्केटमध्ये या ढोबळी मिरचीला ७० ते ८० रुपये दर मिळू लागलाय. ३ ते ४ दिवसांतून मिरचीची तोड करुन ती मुंबईच्या मार्केटला पाठविण्यात येते. आतापर्यंत २ लाख रुपये मिळाले असून आणखी ४ लाख रुपये अपेक्षित आहेत. कमी क्षेत्रातील ही लाखोंची उड्डाणे मार्गदर्शकच आहेत.
चौकट :
कृषी विभागाचेही मार्गदर्शन...
बाजारपेठेचा अभ्यास आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेतले तर
कमी क्षेत्रातही अधिक उत्पन्न मिळू शकते. हे सातारा जिल्ह्यातील अनेकांनी सिध्द करुन दाखवले आहे. यामधील रमेश ससाणे हे शेतकरी आहेत. त्यांनी ऊस, हळद, आले अशा पिकांतूनही भरघोस उत्पन्न घेतलेले आहे.
कोट :
शेतकऱ्यांनी आधुनिक पध्दतीने व तंत्रज्ञानाची जोड देऊन शेती केली तर निश्चितपणे चांगलं उत्पन्न मिळू शकतं. तसेच सतत बाजारपेठेचा अभ्यास करावा. यामुळे कोणते पीक घ्यावं ते समजतं. हे गणित जुळून आलं तर शेती उत्पन्नातून लाखो रुपयेही कमवता येतात. त्यामुळे शेती तोट्याची कधीच होत नाही.
- रमेश ससाणे, शेतकरी भुईंज
फोटो दि.०५सातारा अॅग्री फोटो...