आवक जास्त... दर कमी... टमाटे शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:42 IST2021-03-23T04:42:10+5:302021-03-23T04:42:10+5:30
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी टमाट्याची आवक वाढली होती. त्यातच दरही कमी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर टमाटे शिल्लक ...

आवक जास्त... दर कमी... टमाटे शिल्लक
सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत रविवारी टमाट्याची आवक वाढली होती. त्यातच दरही कमी होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर टमाटे शिल्लक होते. व्यापाऱ्यांनी ते प्लॅस्टिक पिशव्यांत जमा केले होते. (छाया : जावेद खान)
०००००००
खेळण्यांची रंगरंगोटी
सातारा : साताऱ्यात अनेक ठिकाणी असलेल्या खेळण्यांची मोडतोड झाली आहे. तर काही ठिकाणी मात्र खेळण्यांना रंगकाम करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांमधून समाधानाचे वातावरण पसरले आहे. मात्र कोरोनामुळे या बागा बंद असल्याने मुलांना खेळता येत नाही.
०००००
गॅस दरवाढीने हैराण
सातारा : स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढविले जात आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना दरवाढीचा फटका सहन करावा लागत आहे. कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने अनेकांना कामावरून घरी गेल्यानंतर दोन वेळा अंघोळ करावी लागते. मात्र गॅसचा वापर करणे त्यांच्यासाठी शक्य होत नाही. त्यामुळे गॅस दर कमी करण्याची मागणी होत आहे.
००००००
मास्कची आठवण
सातारा : साताऱ्यात कोरोनाबाधित रुग्णसंख्या वाढत आहे. तरीही अनेक सातारकर मास्कचा वापर करत नाहीत. हे संबंधित नागरिक व इतरांसाठी धोक्याचे ठरू शकते. त्यामुळे पालिकची गाडी शहरातून फिरून गर्दी टाळणे तसेच गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याबाबत आठवण करून देत आहे.
०००००००००
रस्त्यावर वाहनतळ
सातारा : साताऱ्यापासून करंजे परिसरातील रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे वाहने उभी केली जातात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. त्यामुळे अनेकदा वादावादीचे प्रसंगही उद्भवत आहेत. त्यामुळे संबंधितांनी योग्य त्या ठिकाणी वाहने उभी करावीत, अशी मागणी होत आहे.
--------
झाडांची नासधूस
सातारा : सातारा शहराच्या आसपास असलेल्या जंगलातून मोठ्या प्रमाणावर वानरसेना शहरात येत आहे. तसेच घराच्या अंगणातील झाडांवर माकडचाळे करत बसलेले असतात. फळं, पानं खातात, तसेच नासधूस करुन टाकत असतात. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
०००००००
जाधववाडीत ग्रामपंचायत इमारतीची मागणी
सातारा : जाधववाडी ग्रामपंचायत सचिवलाय मोडकळीस आलेली आहे. नवीन इमारत बांधकामासाठी तसेच गावातील अंतर्गत काँक्रिटीकरण बंदिस्त गटर मंजूर कामांचे भूमिपूजन व नवीन इमारत बांधण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांना निवेदन दिले. यावेळी माजी सभापती सतीश चव्हाण, राष्ट्रवादीचे महेश कांबळे, सरपंच सुनील भारती उपस्थित होते.
००००००
तरसाचा वावर
सातारा : सातारा तालुक्यातील ग्रामीण भागात तरसांचा वावर वाढला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी काही कामानिमित्ताने प्रवास करणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. एक-दोन जण बाहेर न पडता समूहाने जात आहेत, तर काहीजण इतर दुचाकीचालकांना सावध करतात.
००००
वीज कर्मचाऱ्यांशी वाद
सातारा : ग्रामीण भागात वीजबिल भरलेल्या ग्राहकांचे वीजजोडणी तोडण्यासाठी गेलेल्या वीज कर्मचाऱ्यांवर हल्ले केले जात आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, कर्तव्य कसे पार पाडायचे? हा प्रश्न त्यांना सतावत आहे. नागरिकांनीच बिल भरून सहकार्य करण्याचे आवाहन केले जात आहे.
०००००
एसटीच्या फेऱ्या बंद
सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढल्यामुळे राज्य शासनाने पाचवी ते नववीपर्यंतचे वर्ग पुन्हा बंद केले आहेत. त्यामुळे अनेक मार्गावर रिकामी एसटी धावत आहे. त्यामुळे एसटीच्या फेऱ्या बंद करण्याची नामुष्की वरिष्ठ अधिकाऱ्यांवर ओढावलेली आहे. एक तरी एसटी सुरू करण्याची मागणी होत आहे.
००००००
धूर फवारणीची गरज
सातारा : सातारा शहरातील अनेक इमारती ओढ्यांच्या कडेला आहेत. तेथील रहिवाशांना दररोज डासांचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे रोगराई पसरण्याचाही धोका असतो. त्यामुळे नगरपालिकेने अशा ठिकाणी धुराची फवारणी करावी, अशी मागणी होत आहे.
०००
रिक्षेत नियमांचा भंग
सातारा : कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने सुरक्षित अंतर राखण्याबाबत प्रशासन सांगत आहे. तरीही असंख्य रिक्षांमध्ये चार प्रवासी बसवले जात आहेत. त्यामुळे कोरोनाचा धोका वाढत आहे. वाढीव दर घेत असल्याने कमीच प्रवासी घेण्याची मागणी होत आहे.
००००
चिमणपुरा पेठेत रस्त्याची डागडुजी
सातारा : साताऱ्यातील चिमणपुरा पेठेतील बोळांमध्ये अनेक वर्षांपासून खड्डे पडले होते. तेथे कोणतीही यंत्रणा जात नसल्याने दुरुस्ती होत नव्हती. अखेर या ठिकाणी पालिकेने मुरम टाकला तसेच त्यावर टॅँकरद्वारे पाणी टाकले. यामुळे या बोळांमधून प्रवास करणारे वाटसरू तसेच दुचाकीस्वारांना दिलासा मिळाला आहे. यामुळे नागरिकांमधून पालिका प्रशासनाचे कौतुक केले जात आहे.
००००००००
रस्त्याची दुरवस्था
वडूज : माण तालुक्यातील अनेक मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणावर काटेरी झाडे उगवलेली आहेत. त्यामुळे नागरिकांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. समोरून वाहन आले तर बाजूला उभे राहण्यासाठीही जागा मिळत नाही.
०००००००००
कोरोनाला हरवले
दहिवडी : माण तालुक्यातील दहिवडीत १५ दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित रुग्ण आढळत होते. पालिका, पोलिसांनी योग्य नियोजन केले. त्याला नागरिकांची चांगली साथ मिळाली. त्यामुळे कोरोनाला हरविण्यात यश आले असून, आता सर्व व्यवस्थित चालले आहे.
००००
डोंगररांगा करपल्याने भकास स्वरूप
सातारा : सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा, चारभिंत, यवतेश्वर, कास पठार, पेढ्याचा भैरोबा तसेच ग्रामीण भागात असलेल्या डोंगरांना वणवे लावण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून खाक झाली आहे. तसेच डाेंगररांगाही करपून गेल्या आहेत. त्यामुळे त्याला भकास स्वरुप प्राप्त झाले आहे. याची दखल घेऊन भविष्यात तरी नागरिकांनी वणवे लावणे थांबविण्याची गरज निर्माण झाली आहे.