बाधित जमिनींचा रेल्वे भूसंपादन प्रस्तावात समावेश करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:47 IST2021-09-10T04:47:49+5:302021-09-10T04:47:49+5:30
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली येथील रेल्वेबाधित होणाऱ्या १०० शेतकऱ्यांच्या जमिनीच्या गट नंबरचा रेल्वे भूसंपादन प्रस्तावात समावेश करावा. अन्यथा, ...

बाधित जमिनींचा रेल्वे भूसंपादन प्रस्तावात समावेश करा
कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली येथील रेल्वेबाधित होणाऱ्या १०० शेतकऱ्यांच्या जमिनीच्या गट नंबरचा रेल्वे भूसंपादन प्रस्तावात समावेश करावा. अन्यथा, रेल्वे विस्तारीकरणाचे काम गावात करू देणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांच्या वतीने देण्यात आला आहे.
याबाबत कऱ्हाड प्रांताधिकारी उत्तम दिघे यांना शेतकऱ्यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे. निवेदन देताना शेतकरी नेते सचिन नलवडे, कोयना दूध संघाचे संचालक सुदाम चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते भरत चव्हाण, मोहन भार्गव चव्हाण, कृष्णात चव्हाण, तानाजी चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, अशोक चव्हाण आदींसह कोपर्डे हवेली येथील शेतकरी उपस्थित होते.
याबाबत शेतकऱ्यांनी दिलेली माहिती अशी की, रेल्वे विस्तारीकरणासाठी आवश्यक असलेल्या जमिनीचा सर्व्हे करण्याचे काम रेल्वे विभागाने पुणे येथील एका खासगी कंपनीला दिले होते. त्यावेळी खासगी कंपनीने मनमानी पद्धतीने रेल्वेजवळील गटांचा सर्वे करून शेतकऱ्यांच्या जमिनीमध्ये रेल्वे हद्दीचे पोल उभे केले होते.
याविरोधात सचिन नलवडे यांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर सातबारा
उताऱ्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या जमिनी मोजण्याचे काम भूमी अभिलेख कार्यालयाच्या वतीने करण्यास सुरुवात झाली होती. खासगी कंपनीच्या चुकीच्या सर्वेमुळे कोपर्डेसह इतर गावातील रेल्वे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांचे गट वगळण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यात पुणे-मिरज-लोंढा या रेल्वेमार्गाच्या दुहेरी व विद्युतीकरण भूसंपादनाचे काम रेल्वे प्रशासनाच्या वतीने सुरु आहे. कोपर्डे हवेली येथील सुमारे १३० शेतकऱ्यांच्या जमिनी रेल्वेलगत आहेत. त्यापैकी फक्त २७ गटांचा रेल्वे भूसंपादनात समावेश करण्यात आला आहे. या गटांची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. तर १०० गटांचा भूसंपादन प्रस्ताव तयार करुन मोजणी होणे बाकी आहे. सुमारे १०० गटांचा रेल्वे प्रस्तावात समावेश न झाल्याने शेतकरी नेते सचिन नलवडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपर्डे हवेली येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत.
कोट :
कोपर्डे हवेली येथील रेल्वेशेजारील सर्व बाधित शेतकऱ्यांच्या गटांचा भूसंपादन प्रस्ताव तयार करुन संयुक्त मोजणी करावी. तसेच मोबदला देण्यात यावा. कोपर्डे हवेली येथील बाधित शेतकऱ्यांना मोबदला दिल्याशिवाय रेल्वे विस्तारीकरणाचे काम सुरु करू देणार नाही.
- सुदाम चव्हाण, संचालक कोयना दूध संघ
................................
कोट :
कऱ्हाड तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची जमीन रेल्वेबाधित होत आहे. त्या सर्व शेतकऱ्यांना मोबदला मिळेपर्यंत हा लढा सुरुच राहणार आहे. तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांची जमीन बाधित होत आहे. परंतु, रेल्वे प्रस्तावात नाव आले नाही, अशा शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.
- सचिन नलवडे, शेतकरी नेते
.................................................................