उद्घाटन नव्याचे; पण कामकाज जुन्यातच
By Admin | Updated: July 22, 2014 22:12 IST2014-07-22T21:54:28+5:302014-07-22T22:12:36+5:30
पाटण पंचायत समिती : पशुवैद्यकीय दवाखान्यावरून पुन्हा जुंपणार !

उद्घाटन नव्याचे; पण कामकाज जुन्यातच
पाटण : पंचायत समितीच्या अखत्यारित येणाऱ्या पाटण येथील पशुवैद्यकीय दवाखान्याच्या नव्या इमारतीचे उद्घाटन सभापतींना डावलून राष्ट्रवादीने उरकले़ त्यावरुन सभापतींचे पती व बांधकाम शाखा अभियंत्यांमध्ये मोठे ‘रामायण’ घडले़ परस्परविरोधी तक्रारीही पोलिसात गेल्या़ या घटनेला वीस दिवस होवून गेले तरीही त्या दवाखान्याचे कामकाज जुन्या इमारतीतच सूरू असून उद्घाटन झालेली नवीन इमारत केवळ शोपीस बनून राहिली आहे़
पंचायत समितीच्या मासिक सभेमध्ये याच विषयावरून देसाई - पाटणकर गटात जोरदार खडाजंगी होणार असल्याची चिन्हे आहेत़ बुधवारी ही सभा होणार असून सभेमध्ये पशुवैद्यकीय दवाखाना उद्घाटनावरुन संबंधित अधिकारी व राष्ट्रवादिचे सदस्य यांना सत्ताधारी देसाई गट जाब विचारण्याची शक्यता आहे. त्यासंदर्भात सभापतींसह देसाई गटाच्या सदस्यांनी तयारीही केली आहे़ सभापती वनिता कारंडे यांचे पती नरायण कारंडे यांनी ‘बुटाने मारण्याची’ भाषा वापरली हा धागा पकडून राष्ट्रवादीचे सदस्य आगपाखड करण्याची शक्यता आहे. त्यामुळे होणाऱ्या मासिक सभेला आखाडयाचे स्वरुप प्राप्त होणार आहे़ बांधकाम विभागाचा लेखाजोखा व या विभागाने केलेली रस्त्यांची कामे व अन्य कामांचा आढावा सभेत घेतला जाणार असल्यामुळे अधिकाऱ्यांनाही तयारी करूनच सभेस यावे लागणार आहे. (प्रतिनिधी)