दुर्गम पांगारेने जपली नाट्यपरंपरा
By Admin | Updated: April 19, 2016 01:03 IST2016-04-18T21:07:07+5:302016-04-19T01:03:51+5:30
मंडळात स्थानिक कलाकार : १९५७ पासून ५९ प्रयोग यशस्वी

दुर्गम पांगारेने जपली नाट्यपरंपरा
सातारा : तालुक्यातील परळी भागातील सुमारे २५० उंबरठ्यांचे पांगारे हे छोटेसे गाव. लोकांनी कार्यकर्तृत्वाने गावाची ओळख सर्वदूर पोहोचविली आहे. १९५७ मध्ये गावातील तरुणांनी एकत्र येऊन ‘देवता’ या नावाने नाट्यमंडळाची स्थापना केली. गावातील हौशी कलाकारांनी मंडळ स्थापनेपासून आजअखेर दरवर्षी एक या प्रमाणे तब्बल ५९ नाटकांची निर्मिती करून ती यशस्वीपणे गावातील यात्रेत सादर केली आहेत.
रोजगार, नोकरीच्या निर्मितीने पांगारे येथील अनेक तरुण मुंबई, ठाणे व पुणे शहरात कार्यरत आहेत. काहीतरी वेगळं करून दाखविण्याची जिद्द होती. मुंबईत राहणाऱ्या तरुणांनी एकत्र येऊन १९५७ मध्ये ‘देवता’ नाट्यमंडळाची स्थापना केली. एप्रिल महिन्यात पांगारेची वार्षिक यात्रा असते. या यात्रेत नाटक सादर करण्याची परंपरा सुरू झाली. गावातील कलाकारांनी सादर केलेल्या कलागुणांना गावकऱ्यांसह पंचक्रोशीतील गावकऱ्यांकडून दाद मिळू लागली. त्यामुळे नाटक करणाऱ्या मंडळींचा उत्साह वाढत गेला. पांगारेकरांची नाट्यकला दिवसेंदिवस बहरत गेली.
आजअखेर केलेल्या नाटकांपैकी देवता, रक्तात रंगला गाव, यळकोट मल्हार, राखणदार, बेरड्याची औलाद, ठिणगी, चिकणी बायको दुसऱ्याची ही नाटके रसिकांनी डोक्यावर घेतली. आजअखेर पांगारेकरांनी नाट्यपरंपरा जोपासली आहे.
दिवंगत यशवंत बबन जाधव यांच्या प्रेरणेतून ‘देवता’ नाट्य मंडळाची स्थापना करण्यात आली. पहिले नाटक देवता खूपच गाजले. कोणताही वारसा किंवा आवश्यक साहित्य हाताशी नसताना प्रचंड खटाटोप करून पांगारेकरांनी ही नाट्यपरंपरा जपली आहे. यंदा १७ एप्रिल रोजी झालेल्या यात्रेत ‘शपथ तुला या मंगळसूत्राची’ हे नाटक सादर करण्यात आले. हे नाटक पाहण्यासाठी रसिकांनी मोठी गर्दी केली
होती. (प्रतिनिधी)