श्रीमंत ननावरेखंडाळा : महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेतील वेगळेपण जपणारा उत्सव म्हणून ‘बोरीचा बार’ ओळखला जातो. सुखेड-बोरी या दोन गावांतील हजारो महिला गावच्या सीमेवरील ओढ्याजवळ येऊन एकमेकींना शिव्यांची लाखोली वाहण्याची ही परंपरा शेकडो वर्षांपासून आजही जपली आहे. यंदा मंगळवारी पोलिस बंदोबस्तात हा सोहळा उत्साहात पार पडला. विशेषतः खंडाळ्याचा ‘बोरीचा बार’ सोशल मीडियातून सातासमुद्रापार पोहोचला आहे. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी चक्क शिव्यांची लाखोली वाहण्याचीच परंपरा आहे. सुखेड-बोरी या दोन गावांच्या दरम्यान असलेल्या ओढ्यालगत दरवर्षी नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी ‘बोरीचा बार’ रंगतो. एकमेकींना शिव्या दिल्या जातात. संगतीला डफडे अन् हलगीचा कडकडाट आणि तुतारीची ललकारी सुरू असते. याच निनादात दोन्ही बाजूंकडील महिलांमध्ये उत्साह संचारतो. सुखेड व बोरी या दोन्ही गावांतील शेकडो महिला वाजतगाजत ग्रामदेवताचे दर्शन घेऊन गावाच्या वेशीवरील सरहद्देच्या ओढ्यावर येऊन पावसाच्या संततधारेत ‘बोरीचा बार’ घालतात. या वर्षातून एकदाच उत्साहाने शिव्यांची लाखोली वाहिली जाते. त्यानंतर प्रतिस्पर्धी गटातील महिलेला ओढून आणले जाते. या महिलेला गावात नेऊन साडीचोळी देऊन ओटी भरली जाते. जगावेगळा हा सोहळा पाहण्यासाठी जिल्ह्यातूनच नव्हे तर परजिल्ह्यातून हजारो लोक दाखल होत असतात. यावर्षी मोठ्या उत्साहात हा समारंभ पार पडला.
Satara: महिलांच्या शिव्यांच्या लाखोलीत घुमला ‘बोरीचा बार’, महाराष्ट्रातील आगळीवेगळी परंपरा
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2023 14:34 IST