सातारा : जिल्ह्यात जूनच्या मध्यावर पाऊस सुरू झाला असलातरी महिन्यात सरासरीच्या १२६ टक्के पाऊस झाला आहे. एकूण २४५ मिलिमीटर पाऊस पडला असून जावळी तालुक्यात तब्बल ३२३.७ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. तर माण, फलटण आणि महाबळेश्वर या तीन तालुक्यात सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या महिन्यादरम्यान पाऊस पडतो. दरवर्षी साधारणपणे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सूनचा पाऊस दाखल होतो. यावर्षी मान्सून लवकर दाखल झाला असलातरी जून महिन्याच्या सुरूवातीला पावसात खंड होता. त्यामुळे जून महिन्याच्या मध्यावरच पावसाला सुरूवात झाली. त्यानंतर सलग १५ दिवस जिल्ह्यात पाऊस होत आहे. पूर्व दुष्काळी भागात पावसाचे प्रमाण कमी आहे. तर पश्चिमेकडे जून महिन्यात अधिक पर्जन्यमान झाले आहे.
जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी १९४.१ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, यावर्षी २४५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. १२६.२ टक्के हे प्रमाण आहे. सातारा तालुक्यात सरासरी २१०.९ मिलिमीटर पाऊस होतो. पण, यावर्षी १०७.८ टक्के पाऊस झाला आहे. जावळी तालुक्याची जूनची सरासरी १६१.७ मिलिमीटर आहे. प्रत्यक्षात ५२३.५ मिलिमीटर पाऊस झाला असून याची टक्केवारी तब्बल ३२३.७ इतकी आहे. पाटण तालुक्यात ३५५.७ मिलिमीटर पाऊस झाला. ११०.५ टक्केवारी पर्जन्यमानाची झाली आहे. कोरेगावलाही दमदार पाऊस झाला. जून महिन्याच्या सरासरीत १७४ मिलिमीटर पाऊस झाला. ११०.२ टक्केवारी पावसाची आहे. खटावला १३६.३ मिलिमीटर पाऊस झाला. १४४.४ टक्के हा पाऊस झाला आहे.
माण तालुका दुष्काळी. या तालुक्यात जून महिन्यात सरासरीच्या कमी पाऊस झाला आहे. १०५.१ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, यंदा सरासरी ८५.८ मिलिमीटर पाऊस झाला. ८१.६ टक्के हा पाऊस आहे. फलटण तालुक्यात पर्जन्यमान कमी झाले. ९०.४ मिलिमीटर म्हणजे सुमारे ९७ टक्के पाऊस आहे. खंडाळा तालुक्यात १४०.८ टक्के पाऊस झाला आहे. सरासरी १५२ मिलिमीटर पाऊस पडला. वाई तालुक्यात २६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावरुन तालुक्यात १५८ टक्के पाऊस झाला आहे. तर महाबळेश्वर तालुक्यात सरासरी ९१८.५ मिलिमीटर पाऊस पडतो. पण, प्रत्यक्षात ८६० मिलिमीटर पर्जन्यमान झाले. सुमारे ९४ टक्के पाऊस झाला आहे. तरीही जिल्ह्याचा विचार करता सरासरीच्या २६ टक्के पाऊस जून महिन्यात अधिक झाला आहे.मागीलवर्षी १२० टक्के पाऊस...जिल्ह्यात मागीलवर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला होता. त्यावेळी सरासरी २४४.५ मिलिमीटर पाऊस झालेला. याची टक्केवारी ११९.९ होती. यामध्ये सातारा, पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात सरासरीच्या कमी पाऊस झाला होता. तर जावळी तालुक्यात १५३ टक्के, कऱ्हाड अन् कोरेगावला १४०, खटाव तालुका २६६, माणमध्ये २०३ टक्के पाऊस झाला होता. फलटण तालुक्यातही जून महिन्यात २५० टक्के पाऊस झालेला. यावरुन दुष्काळी तालुक्यात गेल्यावर्षी जून महिन्यात दुपटीहून अधिक पर्जन्यमानाची नोंद झाालेली.