ठोसेघर विभागात दारूविरोधात भडका
By Admin | Updated: January 23, 2015 23:39 IST2015-01-23T20:18:43+5:302015-01-23T23:39:42+5:30
रणरागिणी करतायत वाहनांची कसून तपासणी

ठोसेघर विभागात दारूविरोधात भडका
परळी : ‘ठोसेघर, ता. सातारा येथील रणरागिणींनी दारू विक्रेत्यांच्या विरोधात पुकारलेल्या एल्गाराचा भडका परिसरातील पांगारे, राजापुरी, जांभे, चाळकेवाडीपर्यंत पोहोचला आहे. याठिकाणच्या अवैध दारू विक्रीविरोधात रणरागिणी पदर खोचून सज्ज झाल्या आहेत,’ अशी माहिती ठोसेघरचे सरपंच जयराम चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.ठोसेघर येथे सुरू असलेल्या दारूविक्रीमुळे अनेकांचे संसार धुळीस मिळण्याची शक्यता निर्माण झाली होती. या ‘अक्काबाई’च्या पायी अनेक अनुचित घटना घडल्या होत्या. याची दखल घेत ठोसेघरमध्ये रणरागिणींनी रविवारी (दि. १८) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दारू विक्रेत्यांकडून ४८ बाटल्यांचे बॉक्स हस्तगत करत त्याच्याच घरासमोरील नाल्यात दारूच्या बाटल्या ओतून संतापाला वाट करून दिली होती. तसेच ठोसेघरमधील दारूच्या विक्रेत्यांच्या घराबाहेर रणरागिणींनी गटागटाने खडा पहारा देत दारू पिण्यास येणाऱ्यास हुसकावून लावले होते. या घटनांचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्ताची दखल ठोसेघर परिसरातील जांभे, राजापुरी, पांगारे, चाळकेवाडी या गावातील महिलांनी घेत जर ‘ठोसेघरच्या महिला दारूबंदी विरोधात लढू शकतात; मग आपण का नाही,’ या विचाराने पेटून उठल्या आहेत. ठोसेघरच्या आंदोलनाची पुनरावृत्ती करण्याचा निश्चयच या महिलांनी केला असून, त्यांनी पं. स. सभापती कविता चव्हाण यांच्याकडे सहकार्याची मागणी केली आहे. (वार्ताहर)
वाहनचालक घेतात काळजी
ठोसघर पठारावर पवारवाडी, बोपारशी, चाळकेवाडी, पांगारे, जांभे व इतर गावांतील लोकांच्या वडाप जीप आहेत. रणरागिणी दि. १८ पासून येणाऱ्या प्रत्येक गाड्यांची कसून चौकशी करत आहेत. गाड्यांमध्ये कोणतीही बॅग, पिशवी असेल त्याचीही चौकशी करत आहेत. यामुळे राजवाडा येथून जाणारे वाहनचालक स्वत: दारू घेऊन जाईल, अशा संशयितांकडून पिशवी, पोते, बॅग किंवा बॉक्स चेक करत आहेत.
ठोसेघरच्या महिलांनी दारूबंदीविरोधात घेतलेला पवित्रा स्तुत्य आहेत. त्यांच्या आंदोलनामुळे गावातही उठाव होत असल्याने ठोसेघरसह परिसरात दारूबंदीसाठी महिलांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. तसेच पोलीस व सामाजिक संघटनांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
-राजू भोसले, जिल्हा परिषद सदस्य
अवैध दारू विक्रेत्यांविरोधात महिलांनी पुढाकार घ्यावा. ठोसेघर परिसरातील पोलीस प्रशासन आपल्याला सत्य माहिती देणार नाही. त्यामुळे आपल्याला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. आंदोलनावेळी सर्व महिलांच्या खांद्याला खांदा लावून झुंज देईन.
-कविता चव्हाण,
सभापती, पंचायत समिती, सातारा