मोहिमेचा असाही असर; दारातला कचरा रस्त्यावर
By Admin | Updated: November 28, 2014 00:14 IST2014-11-27T21:14:54+5:302014-11-28T00:14:04+5:30
स्वच्छता अभियान : स्वत:पुरते पाहण्याची सवय जाईना

मोहिमेचा असाही असर; दारातला कचरा रस्त्यावर
सातारा : ‘स्वच्छ व सुंदर सातारा’ ही संकल्पना मागील अनेक वर्षांपासून पालिका राबवित आहे. यासाठी विविध प्रकारचे प्रकल्पही राबविले गेले. नुकतेच नवीन शासनाने संपूर्ण स्वच्छता अभियान योजना अंमलात आणली. यासाठी विविध कार्यालयात गांधी जयंतीदिवशी अधिकाऱ्यांपासून सर्वांनीच स्वच्छता केली; पण शहरातील आजही कचरा रस्त्यावरच आहे. व्यावसायिकही दुकाने झाडून कचरा रस्त्यावरच सोडतात. जोपर्यंत ही मानसिकता बदलत नाही, तोपर्यंत स्वच्छ सातारा कसा होईल, असा प्रश्न सातारकरांमध्ये उपस्थित होत आहे. ज्या ठिकाणी व्यवसाय केला जातो, त्या ठिकाणी स्वच्छता ठेवली तर लक्ष्मी येते, अशी भारतीय संस्कृती आहे. या संस्कृतीनुसार सकाळी बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक दुकानांसमोरील रस्ता स्वच्छ झाडून पाणी शिंपडतात; परंतु हे व्यावसायिक झाडून झालेले केरकचरा रस्त्याच्या मधोमध सोडून देतात. त्यामुळे दुकाने स्वच्छ झाले तरी रस्त्यावर मात्र अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग राहून जातात. दिवसभर वाहनांची रहदारी, पादचारी यामुळे हाच कचरा इतरत्र पसरून परिसर अस्वच्छ होतो. त्यामुळे पालिकेने अनेक योजना स्वच्छतेसाठी राबविल्या तरी जोपर्यंत प्रत्येक व्यावसायिक रस्त्यावरील कचरा जोपर्यंत उचलत नाही, तोपर्यंत ही मोहीम १०० टक्के पूर्ण कशी होणार, यासाठी जे व्यावसायिक या पद्धतीने कचरा रस्त्यावर सोडतात त्यांनीच याची खबरदारी घेतली तर बाजारपेठही स्वच्छ होईल, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. (प्रतिनिधी) रस्त्यावरील कचरा पुन्हा दुकानामोरच स्वच्छ दुकाने ठेवून ग्राहकाला विनम्र सेवा देणारे काही व्यावसायिक मात्र रस्त्यावरचा कचरा कधीच उचलत नाहीत. दुकानाचे परिसर झाडून तो ढीग रस्त्यावरच सोडला जातो. सततच्या रहदारीमुळे हा कचरा पुन्हा दुसऱ्या दुकानासमोर जातो, याचे भानही दुकानदारांनी ठेवले पाहिजे.