महाबळेश्वर पालिकेकडून विसर्जन हौद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:41+5:302021-09-13T04:38:41+5:30

महाबळेश्वर : शहरातील गणेशभक्तांच्या सोयीसाठी पालिकेच्या वतीने नळावरील विहिरीशेजारी गणेश विसर्जन हौद बांधला आहे. त्या ठिकाणी केलेल्या व्यवस्थेची मुख्याधिकारी ...

Immersion tank from Mahabaleshwar Municipality | महाबळेश्वर पालिकेकडून विसर्जन हौद

महाबळेश्वर पालिकेकडून विसर्जन हौद

महाबळेश्वर : शहरातील गणेशभक्तांच्या सोयीसाठी पालिकेच्या वतीने नळावरील विहिरीशेजारी गणेश विसर्जन हौद बांधला आहे. त्या ठिकाणी केलेल्या व्यवस्थेची मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी रविवारी पाहणी केली. यावेळी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

महाबळेश्वर शहरात घरगुती व सार्वजनिक गणेश मंडळे हे पाच दिवसांचे गणपती बसवितात. त्यामुळे शहरातील ९५ टक्के गणेशमूर्तींचे विसर्जन पाचव्या दिवशीच होते. दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशी दिवशी काही मोजकीच मंडळे विसर्जन करतात. काही वर्षांपूर्वी नळावरील विहिरीत विसर्जन केले जात होते. परंतु, ती विहीर गाळाने भरत होती. शिवाय दरवर्षी विहीर स्वच्छ करावी लागत होती. विहिरीतील पाण्याचे नैसर्गिक झरे हे कमी होऊ लागले होते. शिवाय विहिरीत गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी पर्यावरणप्रेमी आक्षेप घेत होते. म्हणून तत्कालीन नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी आठ वर्षांपूर्वी सार्वजनिक विसर्जन विहिरी शेजारी एक मोठा कृत्रिम हौद तयार केला. तेव्हापासून या कृत्रिम हौदातच गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाते.

विहिरीत कोणी विसर्जन करू नये यासाठी ती विहीर बंद करण्यात आली आहे. पालिकेने केलेल्या या सर्व व्यवस्थेची पाहणी पालिकेच्या मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी नुकतीच केली. हौदामध्ये पूर्ण पाणी भरा अशा सूचना त्यांनी केल्या. विसर्जन तळावर येणारी वाहने पाहता त्या तळावरील सर्व खड्डे हे बुजविण्यात आले आहेत. कृत्रिम हौदाशेजारी निर्माल्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होणार नाही याची खबरदारी घ्यावी, अशा सूचना मुख्याधिकारी पाटील यांनी कर्मचाऱ्यांना केल्या.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील घरगुती गणपती विसर्जनासाठी मागील वर्षापासून मुख्याधिकारी पल्लवी पाटील यांनी शहरात चौदा ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली होती. यंदाही अशीच व्यवस्था केली जाणार आहे. मागील वर्षी ज्या ठिकाणी प्रतिसाद मिळाला नाही अशा दोन ठिकाणांवरील कुंड रद्द करून यंदा शहरात बारा ठिकाणी कृत्रिम कुंडांची व्यवस्था केली जाणार आहे. नागरिकांची एकाच ठिकाणी विसर्जनासाठी गर्दी होऊ नये यासाठी ही व्यवस्था करण्यात येत आहे.

Web Title: Immersion tank from Mahabaleshwar Municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.