गणेशमूर्ती विसर्जन यंदाही कृत्रिम तळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2021 04:41 IST2021-09-03T04:41:40+5:302021-09-03T04:41:40+5:30

सातारा : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सातारा पालिका सज्ज झाली आहे. पालिकेकडून गणेशाचे आगमन व विसर्जनाची तयारी ...

Immersion of Ganesh idol in artificial pond again | गणेशमूर्ती विसर्जन यंदाही कृत्रिम तळ्यात

गणेशमूर्ती विसर्जन यंदाही कृत्रिम तळ्यात

सातारा : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी सातारा पालिका सज्ज झाली आहे. पालिकेकडून गणेशाचे आगमन व विसर्जनाची तयारी सुरू करण्यात आली आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही सार्वजनिक व घरगुती गणेमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तळ्यात केले जाणार असून, शहरात चार ठिकाणी कृत्रिम तळी उभारण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे.

गणेशाच्या आगमनाची चाहूल लागताच सर्वत्र उत्साहाला उधाण येते; परंतु कोरोनामुळे यंदा उत्सवाचे चित्रच बदलून गेले आहे. शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीनुसार गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा लागणार आहे. हा उत्सव निर्विघ्न पार पाडण्यासाठी पालिकेच्या बांधकाम विभागाकडून सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, त्यानुसार विविध कामे हाती घेण्यात आली आहेत.

बुधवार नाका परिसरात पालिकेची पाणीसाठवण टाकी आहे. या टाकीशेजारी असलेल्या मोकळ्या जागेवर ५० मीटर लांबी, २५ मीटर रुंदी आणि १२ मीटर खोलीचे कृत्रिम तळे उभारण्यात आले आहे. दरवर्षी सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे या तळ्यात विसर्जन केले जाते. याव्यतिरिक्त हुतात्मा स्मारक, दगडी शाळा (सदर बझार), कल्याणी शाळा येथेही कृत्रिम तळ्याची उभारणी केली जाणार आहे.

सध्या सर्वच तळी स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. तळी स्वच्छ करून त्यात प्लास्टिक लायनर (कागद) टाकला जाणार आहे. यानंतर त्यामध्ये पाणीसाठा केला जाणार आहे. सुरक्षेसाठी तळ्यांभोवती बॅरिकेट्स बसविले जाणार आहेत. वीज, लाकडी मचान व सीसीटीव्हीदेखील बसविले जाणार आहेत.

(चौकट)

शंभर टनी क्रेन

दरवर्षीप्रमाणे यंदाही बुधवार नाक्यावरील सर्वात मोठ्या कृत्रिम तळ्यात सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाणार असून, विसर्जनासाठी तब्बल शंभर टनी हायड्रोलिक क्रेनचा उपयोग केला जाणार आहे. ही क्रेन पुण्यावरून मागविली जाते.

(कोट)

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बांधकाम विभागाने कृत्रिम तळी स्वच्छ करण्याचे काम हाती घेतले आहे. येत्या काही दिवसांत तळ्यांत पाणीसाठा केला जाईल. हा सोहळा निर्विघ्न पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जातील.

- दिलीप चिद्रे, नगरअभियंता, सातारा पालिका

Web Title: Immersion of Ganesh idol in artificial pond again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.