तहसीलदारांची बावधनला तातडीने भेट

By Admin | Updated: December 2, 2014 00:18 IST2014-12-01T23:00:53+5:302014-12-02T00:18:11+5:30

‘लोकमत’चे कौतुक : काविळ झालेल्या रुग्णांची चौकशी

Immediate gift to Tahsildar's wife | तहसीलदारांची बावधनला तातडीने भेट

तहसीलदारांची बावधनला तातडीने भेट

बावधन : बावधन, ता. वाई येथे काविळीच्या आजाराची तीनशे जणांना लागण झाल्याचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध होताच तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांनी तातडीने गावास भेट दिली. बावधनच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेत असणाऱ्या रुग्णांची त्यांनी भेट घेऊन चौकशी केली. यावेळी त्यांनी उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना काळजी घेण्याबाबत सूचना केली.
बावधन गावची लोकसंख्या सुमारे १५ हजार आहे. या गावाला नागेवाडी धरणातून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. येथील जलशुद्धीकरण करणारा प्रकल्प बंद असल्यामुळे लोकांना दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे लोक काविळीने आजारी पडत आहेत.
याबाबत ‘लोकमत’मध्ये ग्रामस्थ काविळीने आजारी पडल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच तहसीलदार सदाशिव पडदुणे यांनी बावधनला भेट दिली. यावेळी त्यांनी गटविकास अधिकारी दीपा बापट, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता आर.बी. साठे यांना तत्काळ दोन हजार लिटरचे पाणी शुद्धीकरण व टीसीएल पावडरचे मिश्रण करणारी सिमेंटची टाकी बांधावी. यामधून पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य वाहिनीला ती जोडून त्याद्वारे संपूर्ण गावास पाणीपुरवठा करण्याचे आदेश दिले.
२००७-०८ पासून नागेवाडी धरणातून गावाच्या मुख्य टाकीत सायफन पद्धतीने पाणी टाकले जात आहे. पण, टाक्यांची स्वच्छता व टीसीएल पावडरचा वापरच होत नव्हता. त्यामुळे काविळीचा आजार झाला, असल्याचे सांगण्यात येत आहे. बावधनमधील रुग्णांवरती शासकीय रुग्णालय तसेच खासगी रुग्णालयातही उपचार सुरू आहेत.
दरम्यान, ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध होताच शासकीय यंत्रणा तत्परतेने कामाला लागली. यामुळे ‘लोकमत’चे सर्वत्र कौतुक होत
आहे. (वार्ताहर)

कवठे येथेही काविळीचे वीसहून अधिक रुग्ण
कवठे : बावधनपाठोपाठ वाई तालुक्यातील कवठे येथेही काविळीचे रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. सध्या वीसपेक्षा जास्त रुग्ण काविळीच्या आजाराशी सामना करीत आहेत. हे सर्वच्या सर्व रुग्ण वाई कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दररोज शेतमाल घेऊन जाणारे तरुण शेतकरी आहेत. दररोज शेतामधून माळवे काढायचे व दुचाकीवरून किंवा तरकारी वाहतूक करणा-या वाहनातून वाई बाजार समितीत पोहोचायचे. तेथे पाणी प्यायचे, चहा-नाष्टा करायचा आणि पुन्हा आपापल्या गावी माघारी यायचं. हा वाई तालुक्यातील विविध गावांच्या शेतकरी वर्गाचा नित्यक्रम. अशामुळेच सुमारे वीस जणांना कावीळ झाल्याचे सांगण्यात येत आहे.


दीड महिन्यापूर्वी ग्रामस्थांनी विश्वासाने सरपंचपदाची माळ माझ्या गळ्यात घातली. बाधवन गावाच्या विकासासाठीच माझी कारकिर्द असेल. गावात काविळचे रुग्ण आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यासाठी मी व माझे सहकारी सदस्य प्रयत्न करीत आहोत. आम्ही नक्कीच या संकटावर मात करण्यात यशस्वी होऊ.
- नारायण पिसाळ, सरपंच

Web Title: Immediate gift to Tahsildar's wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.