चचेगावातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:35 IST2021-05-22T04:35:54+5:302021-05-22T04:35:54+5:30
चचेगाव, ता. कऱ्हाड येथील भुईसपाट झालेल्या नुकसानग्रस्त केळीच्या बागांची माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या बांधावर ...

चचेगावातील शेतकऱ्यांना तात्काळ नुकसानभरपाई द्या
चचेगाव, ता. कऱ्हाड येथील भुईसपाट झालेल्या नुकसानग्रस्त केळीच्या बागांची माजी मुख्यमंत्री व आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी गुरुवारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे कऱ्हाड दक्षिण तालुकाप्रमुख मनोहर शिंदे, पंचायत समिती सदस्य उत्तमराव पाटोल, तहसीलदार अमरदीप वाकडे, मंडलाधिकारी पंडित पाटील, उपविभागीय कृषी अधिकारी दौलत चव्हाण, तालुका कृषी अधिकारी रियाज मुल्ला, सुशांत भोसले, बाळासाहेब माळी, तलाठी महादू राऊत उपस्थित होते.
चक्रीवादळाने चचेगाव येथील विलास भीमराव पवार, साहेबराव नाना पवार, हनुमंत दाजी हुलवान यांची सात एकरमध्ये केळीच्या बागा आहेत. पंधरा ते वीस दिवसांत ती केळी विक्रीयोग्य होणार होती. मात्र, रविवारच्या वाऱ्याने हातातोंडाशी आलेल्या बागेतील केळीची झाडे वादळी वाऱ्याने मोडून पडली आहेत. या बागा उद्ध्वस्त झाल्यामुळे किमान २० लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त बागांची सुरुवारी माजी मुख्यमंत्री व आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर हजेरी लावली. केळीच्या पडलेल्या बागेत जाऊन पाहणी केली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहून तातडीने पंचनामे करून जास्तीत जास्त नुकसानभरपाई देण्याचे आदेश अधिकाऱ्यांना त्यांनी दिले.
फोटो
चचेगाव येथील नुकसानग्रस्त केळीच्या बांगाची माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली. (छाया- माणिक डोंगरे)