तांबवे धरणातून बेकायदा वाळू उपसा
By Admin | Updated: June 10, 2017 13:55 IST2017-06-10T13:53:23+5:302017-06-10T13:55:31+5:30
प्रशासनाचे दुर्लक्ष : दररोज शेकडो ट्रक गाळ ; धरण पात्रात २५ ते ३० फूट खोल खड्डे

तांबवे धरणातून बेकायदा वाळू उपसा
आॅनलाईन लोकमत
लोणंद (सातारा), दि. १0 : सातारा जिल्ह्यातील फलटण आणि खंडाळा तालुक्याच्या सीमेवर असलेल्या तांबवे धरणातून गाळ काढण्याच्या नावावर बेकाकायदा वाळू उपसा सुरू आहे. रोज शेकडो ट्रक व डंपर गाळ काढण्याच्या नावाखाली वाळू काढून साठा करत आहेत.
खंडाळा आणि फलटण तालुक्यात छोटे-मोठे पाझर तलाव व धरण असून, या धरणापैकी फक्त तांबवेतील धरणातीलच गाळ काढण्याचा निर्णय घेतला गेला. नक्की परवानगी कोणी व कशी दिली हा खरा प्रश्न निर्माण झाला असून, तालुक्यामध्ये याची उलट-सुलट चर्चा सुरू आहे. धरणातील गाळ काढण्याबरोबरच वाळू उपसाही सुरू असल्याचे गावकऱ्यांनी महसूल विभागाच्या वारंवार लक्षात आणून देऊनही प्रशासन झोपेचे सोंग घेत आहे.
तालुक्यातील बोकाळलेल्या वाळू माफियांना आवर घालण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली पाहिजे; परंतु वाळू उपशाकडे कानाडोळा करत त्यांना आश्रय देण्याचे काम प्रशासन करत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळत आहे.
खंडाळा व फलटण तालुक्याच्या सीमेवर असणारे तांबवे धरणामध्ये अवैद्यरीत्या वाळू उपसा झाला तर कार्यवाही नेमकी कोणी करायची, हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे वाळू उपसा करणाऱ्या टोळ्या सोकावलेल्या आहेत.
धरण क्षेत्रात २५ ते ३० फूट खोल खड्डा खोदून वाळू उपसा होत आहे.