देऊरमधील नदीपात्रात अवैध वाळू उपसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:50 IST2021-06-16T04:50:38+5:302021-06-16T04:50:38+5:30
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाळूचे आगार असलेल्या देऊर येथील तळहिरा ओढ्यातून रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपसा ...

देऊरमधील नदीपात्रात अवैध वाळू उपसा
वाठार स्टेशन : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील वाळूचे आगार असलेल्या देऊर येथील तळहिरा ओढ्यातून रात्रीच्या अंधारात अवैध वाळू उपसा आजही सुरूच आहे. या वाळू सम्राटांना प्रशासनाने आवर घालावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.
देऊर गावाच्या पश्चिम बाजूकडून वसना नदी वाहते. याच नदीला तळीयेमधून येणारा तळहिरा ओढा मिळतो. गेली अनेक वर्ष या नदीपात्रात कोणत्याही प्रकारचा शासनाचा अधिकृत वाळू लिलाव झाला नसल्याने आणि गत दोन-तीन वर्षात मुबलक पाऊस झाल्याने सध्या हे नदीपात्र आणि ओढ्यात प्रचंड वाळूसाठा आहे. दोन वर्षात जरी शासनाचे लिलाव झाले नसले तरी या नदीपात्राच्या शेजारी असलेल्या जमिनीतून रेतीमिश्रित मातीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी झाली आहे.
आजही या नदी व ओढ्यातून रात्रीची वाळू उपसली जात असल्याने या वाळूसम्राटांच्या मुसक्या आवळवण्याची गरज आहे. या बाबतीत वरिष्ठांनी लक्ष घालावे, अशी मागणी देऊर ग्रामस्थ करत आहेत. नुकतीच देऊर गावची ग्रामसभा ऑनलाईन झाली. या सभेत वाळू उपशाबाबत चर्चा झाली होती. मात्र, कोणताही ठोस निर्णय झाला नाही.