बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : खटाव तालुक्यातील राज्यमार्गांचा दर्जा खालावला
By Admin | Updated: December 29, 2014 00:02 IST2014-12-28T22:15:53+5:302014-12-29T00:02:36+5:30
ठेकेदारांचे संबंध अन् कमिशन--साईडपट्ट्यांसाठी रस्त्याचाच मुरुम

बांधकाम विभागाचे दुर्लक्ष : खटाव तालुक्यातील राज्यमार्गांचा दर्जा खालावला
खटाव : खटाव तालुक्यातून जाणाऱ्या विविध राज्यमार्गांचे नंबर बदलले आहेत. मात्र, रस्त्यांचा दर्जा खालावला असून, जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची वेळ आलेली आहे.खटाव तालुक्यातून मिरज-भिगवण, सातारा-पंढरपूर, सातारा-विटा, मल्हारपेठ-पंढरपूर असे चार राज्यमार्ग जात आहेत. या राज्य मार्गामधील मिरज-भिगवण हा राज्यमार्गापूर्वी १० क्रमांकाचा होता. तो आज ६० क्रमांकाचा झालेला आहे. मल्हारपेठ-पंढरपूर हा राज्यमार्ग पूर्वी ७६ क्रमांकाचा होता. आज तो १४३ आहे. तसेच विटा-सातारा हा राज्यमार्ग पूर्वी ७८ क्रमांकाचा होता, आज तो १४५ क्रमांकावर गेला आहे.तालुक्याच्या सरहद्दीवरून सांगली, सोलापूर जिल्ह्यांमध्ये जाणाऱ्या या मार्गाची स्थिती आपल्या रस्त्यापेक्षा कितीतरी उत्कृष्ट आहे. जिल्ह्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाने या खालावलेल्या मार्गाच्या क्रमांकाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. राज्य मार्गांचे क्रमांक कोसळ्यामुळे भविष्यात या मार्गावर शासनामार्फत दिला जाणारा निधीही कमी होईल की काय, अशी शंका व्यक्त होत आहे. राज्यमार्गाबरोबरच तालुक्यातील अंतर्गत रस्ते अतिशय खराब झाले आहेत. यामध्ये कलेढोण, पाचवड रोड, मायणी-पडळ रोड,मायणी-निमसोड रोड या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाल्यामुळे या मार्गावरील एसटी बसेस पूर्णत: बंद झालेल्या आहेत. (वार्ताहर)
ठेकेदारांचे संबंध अन् कमिशन
रस्त्याच्या कामाचे टेंडर देताना रस्त्यांच्या दर्जापेक्षा ठेकेदारांचे संबंध व त्या मोबदल्यामुळे कमिशन देण्याची प्रथा असल्यामुळे दर्जा व गुणवत्ता दिसत नाही.
५०० मीटरच्या टेंडरमध्ये १००० मीटरचे काम
एखाद्या ठेकेदाराला ५०० मीटरचे काम दिले, तर राजकीय मंडळी त्यांच्या कडून १००० मीटरचे काम करून घेतात. यामुळे साहजिकच ठेकेदाराला रस्त्याची गुणवत्ता देता येत नाही.
साईडपट्ट्यांसाठी रस्त्याचाच मुरुम
ठेकेदाराला रस्त्याचे काम दिल्यानंतर रस्त्याच्याकडेला असणाऱ्या साईडपट्ट्या ठेकेदार रस्त्याकडेचाच मुरुमाने भरल्यामुळे दोन्ही बाजूस रस्ता खच असल्यामुळे रस्ता लवकर खराब होत आहे.