झोपेत पासवर्ड द्याल तर उडेल झोप!

By Admin | Updated: August 9, 2015 21:09 IST2015-08-09T21:09:13+5:302015-08-09T21:09:13+5:30

बेसावधांचा बळी : बँकेतील पैसे होतायत क्षणात गायब : खातेधारक हवालदिल

If you pass a sleepy password then you will fall asleep! | झोपेत पासवर्ड द्याल तर उडेल झोप!

झोपेत पासवर्ड द्याल तर उडेल झोप!

सातारा : ‘दुनिया झुकती है झुकानेवाला चाहीए’ याप्रमाणे सध्या अनेक ठिकाणी आपल्याला बोलबच्चन लोक पाहायला मिळतात. स्वत:जवळ दगड असला तरी तो विकण्याची कला ज्याच्याजवळ आहे. तो सध्याच्या जीवनात टिकून राहू शकतो, अशी उदाहरणे दिली जातात. मात्र, अशा बोलघेवड्यांकडून लोकांना फसविण्याचे नवनवीन फंडे पुढे येत असून, त्यापैकीच एक म्हणजे, ‘तुमचा एटीएमचा पासर्वड मागण्याची कला. एटीएमचा पासर्वड देऊन स्वत:च्या पायावर दगड मारून घेतलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यामुळे केवळ पोलिसांच्या नावाने दगड फोडण्यापेक्षा स्वत: चाणाक्ष आणि सजग राहिलं तर अशा फसवणुकीतून आपण सहीसलामत सुटू शकतो. हे आपण स्वत: ठरविलं पाहिजे.
‘तुमचे एटीएम ब्लॉक झाले आहे. व्हेरिफिकेशनसाठी तुमचा एटीएमचा पासर्वड द्या,’ असा अज्ञाताचा फोन येतो. समोरची व्यक्ती हुशार असेल तर अशा व्यक्ती संबंधिताला आपल्या एटीएमचा पासर्वड देत नाहीत. मात्र, भोळीभाबडी लोकं अशा बोलघेवड्याच्या बोलण्यावर विश्वास ठेवून त्याला एटीएमचा पासर्वड देतात. त्यामुळे अशा लोकांवर मग पश्चातापाची वेळ येते.
हल्ली बँक खाते कोणाचे नाही, असे होणार नाही. सात-आठ वर्षेबँकेच्या व्यवहारातून लोकांना अनुभव आलेला असतो. या कालावधीत बँकेतून कधीही फोन आलेला नसतो. आपली वैयक्तिक माहिती बँकेतील अधिकारी कधीही कोणाला फोनवर विचारत नाहीत. हे माहिती असतानाही अनेकजण अज्ञाताकडून आलेल्या फोनला बळी पडतात. फोन करणारी व्यक्ती हिंदीतून किंवा मराठीतून बोलत असते. ‘तुमचे खाते कोणत्या बँकेत आहे. कधी सुरू केले आहे. एटीएम वापरता का?, असे अनेक प्रश्न विचारले जातात. त्यानंतर ‘तुमचं सध्याचे एटीएम आहे. ते आमच्या मशीनवर ब्लॉक दिसत आहे. त्यामुळे तुमचं व्हेरिफिकेशन करण गरजेचे आहे, असे सांगितले जाते. एक अनोळखी व्यक्ती एवढे प्रश्न विचारतेय. तेही शंकास्पद. तरीही काहींना जराही त्याच्या बोलण्याची शंका येत नाही. याचे अनेकांना आश्चर्य वाटतंय. (प्रतिनिधी)


पोलिसांची डोकेदुखी !
उठसूट काहीही झालं तरी पोलिसांकडे जाण्याची काहीना सवय असती. स्वत:च्या चुकांचे खापर अशी लोकं नेहमी पोलिसांवर फोडतात. मग गुन्हा घडला तरी पोलीस तपास करत नाहीत. अशी ओरड केली जाते. मात्र आपण स्वत: जर अशा छोट्या-छोट्या गोष्टींतून सावधानता बाळगली तर आपण स्वत: कधीच फसले जाऊ शकणार नाही.
अज्ञात व्यक्ती फोन करून तुमचा पासर्वड विचारते. त्यावेळी तुम्ही पोलिसांना विचारत नाही की, ‘मी पासर्वड देऊ का म्हणून.’ किंवा तुमच्या मोबाइलवर येणारा कॉल पोलीस रेकॉर्ड करत नाहीत. की त्यामुळे तुमची फसवणूक होतेय, हे पोलिसांनी अगोदरच सांगायला पाहिजे. ज्या लोकांची अशाप्रकारे फसवणूक झाली आहे. अशा अनेका लोकांनी आपण स्वत:चाच याला जबाबदार असल्याची पोलिसांकडे कबुलीही दिली आहे. तरीही लोक अशा भूलथापांना बळी पडत असल्याने पोलिसांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढतच आहे.

समाजातील घडामोडींवर दुर्लक्ष !
समाजामध्ये दररोज काय घडामोडी होतायत. याकडे दुर्लक्ष करणारीच व्यक्ती अशा प्रकारच्या फसवणुकीमध्ये अडकली जात असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. नेहमी वर्तमानपत्रामध्ये कशा घटना घडल्या. याच्या बातम्या येत असतात. पुढच्याला ठेच लागली तर मागचा शहाणा होतो; परंतु पुढच्याला ठेच लागली आहे. हे जर पाठीमागच्याला माहीतच नसेल तर त्यालाही पुढच्यासारखा अनुभव येणारच. अशातला हा प्रकार आहे. त्यामुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तीकडून आलेल्या फोनवर आपली वैयक्तिक माहिती देऊ नये. एवढीच खबरदारी घेतली तर स्वत:ला पश्चातापाची वेळ येणार नाही.
नोकरीचे फॉर्म इंटरनेट कॅफेतून भरताना आॅनलाईन परीक्षा शुल्क भरतो. अशावेळी एटीएमचा पीन टाकत असतो. त्यानंतर आपण तत्काळ पीन नंबर बदलणे गरजेचे आहे.

Web Title: If you pass a sleepy password then you will fall asleep!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.