शहाणपण होते, तर १०० रुपयाचे बिल का बुडविले?:अविनाश मोहिते
By Admin | Updated: April 18, 2015 00:10 IST2015-04-17T21:52:54+5:302015-04-18T00:10:31+5:30
२९० कोटींचे कर्ज माजी अध्यक्ष डॉ. मोहिते यांनी केले. ६५ कोटींत होणाऱ्या कोजन प्रकल्पासाठी १२५ कोटी खर्च आला. त्याचे हप्ते कारखाना अजून फेडतो.

शहाणपण होते, तर १०० रुपयाचे बिल का बुडविले?:अविनाश मोहिते
कऱ्हाड : ‘डॉ. इंद्रजित मोहिते हे दुसऱ्याला शहाणपण शिकवतात. २००५ मध्ये जेव्हा ते सत्तेत आले तेव्हा यांना सभासदांना सेवासुविधा देण्याचे शाहणपण का सुचले नाही. ऐवढेच आपल्याला शहाणपण होते, तर दिवाळीचे १०० रुपयाचे बिल का बुडविले?,’ असा सवाल यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी केले.
येणके व किरपे, ता. कऱ्हाड येथील झालेल्या सभासद संपर्क दौऱ्यात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे संचालक सर्जेराव लोकरे, माजी सरपंच नारायण पाटील, उपसरपंच राहुल गरुड, शामराव गरुड, किरपे-येणके-पोतले पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष सदाशिव पवार, किरपेचे माजी सरपंच शामराव माने, सोसायटीचे अध्यक्ष संजय देवकर, उपाध्यक्ष जगन्नाथ माने, उपसरपंच भानुदास माने उपस्थित होते.अविनाश मोहिते म्हणाले, ‘निवडणुकीसाठी आमच्या गावातील मोहिते बंधू फारच उताविळ झाले आहेत. डॉ. इंद्रजित मोहिते कारखान्यावर खोटे नाटे आरोप करीत आहेत. कारखाना कशा पद्धतीने चालला पाहिजे, याबाबत आम्हाला उपदेश करीत आहेत; पण त्यांच्यापेक्षा आम्ही कारखाना चांगला चालविला आहे. तुम्हाला ऐवढेच जर शाहणपण होते, तर दोन रुपये किलो असणारी साखर १४ रुपये का केली. २९० कोटींचे कर्ज माजी अध्यक्ष डॉ. मोहिते यांनी केले. ६५ कोटींत होणाऱ्या कोजन प्रकल्पासाठी १२५ कोटी खर्च आला. त्याचे हप्ते कारखाना अजून फेडतो. मग सांगा कारखान्यावर कर्जाचा डोंगर कुणी केला? आम्ही संचालक मंडळाच्या पहिल्याच बैठकीत सभासदांना दोन रुपये किलो दराने वर्षाला ६० किलो साखर देण्याचे वचन पाळले. शेजारील कारखान्यांच्या बरोबरीने उसाला दर दिला. २०११-१२ मध्ये गळिताला आलेल्या उसाला राज्यात क्रमांक चारचा दर दिला. संचालक मंडळाने नेहमी सभासद हिताचे धोरण राबविले. उसाला वेळेवर पाणी, उसाचे वेळेवर गाळप आणि योग्य ऊसदर, हे आपल्या संचालक मंडळाचे धोरण आहे. इरिगेशन योजनांना १६ तास वीज कशी मिळेल, याची व्यवस्था आम्ही केली. यावेळी राहुल गरुड, उपसरपंच भानुदास माने यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. अमोल पाटील यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)