एकरकमी एफआरपी न मिळाल्यास राज्यभर आंदोलन
By Admin | Updated: October 2, 2015 23:33 IST2015-10-02T23:30:05+5:302015-10-02T23:33:22+5:30
राजू शेट्टी : ठोस पावले न उचलल्यास कोणालाही दिवाळी गोड लागू देणार नाही

एकरकमी एफआरपी न मिळाल्यास राज्यभर आंदोलन
सातारा : ‘तीन टप्प्यांत शेतकऱ्यांना एफआरपी देण्याचा घाट घातला जात आहे. वार्षिक सभेत ऐनवेळी विषय घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे. शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी मिळावी, यासाठी राज्यभरातील शेतकरी अर्ज करून ते अर्ज शासनाला मोर्चा काढून देणार आहोत, याची सुरुवात दि. १६ रोजी कोल्हापूर येथे साखर आयुक्त कार्यालयावर मोर्चाने होणार आहे, त्यानंतर टप्प्याटप्प्याने राज्यभरातही हे आंदोलन सुरू राहणार आहे. दरम्यान, सरकारने याबाबत ठोस पावले उचलली नाहीत तर आम्ही रस्त्यावर उतरू. कोणाला यंदा दिवाळी खाऊ देणार नाही,’ असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
खासदार राजू शेट्टी शुक्रवारी साताऱ्यात आले होते. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘जिल्हा बँका या राजकारणांचा अड्डा बनत असून, पूर्वीच्या सरकारने आमच्या विरोधात सूडबुद्धीने गुन्हे दाखल केले आहेत. पुढील वर्षी उसाचा हंगाम सुरू होईल. त्या हंगामात साखर कारखानदारांनी तीन टप्प्यांत एफआरपी रक्कम देण्याचा विषय वार्षिक सभेत घेऊन शेतकऱ्यांची दिशाभूल चालविली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोललो तेव्हा खरे वास्तव समजले, असे काहीच झाले नसल्याचे त्यांनी
सांगितले.
जे कारखाने एकरकमी एफआरपी देणार नाहीत. त्यांच्यावर शुगरकेन कंट्रोल १९६६ नुसार कारवाई केली पाहिजे, जे कारखाने एफआरपी देत नाहीत. त्या कारखान्यांच्या संचालक मंडळावर कारवाई करावी, असा शासनाकडे आग्रह धरणार आहे. त्यासाठी शेतकऱ्यांकडून अर्ज भरून घेत आहोत.
ज्या कारखान्याबरोबर करार केला आहे. त्या कारखान्याने एफआरपीप्रमाणे दर द्यावा, हे अर्ज गोळा करून १६ आॅक्टोबरला कोल्हापुरात साखर आयुक्तांच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. असा इशाराही खा. शेट्टी यांनी दिला. (प्रतिनिधी)