टेंभू धरणबाधितांना मोबदला न दिल्यास शेतकरी जलसमाधी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:46 IST2021-09-07T04:46:32+5:302021-09-07T04:46:32+5:30

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. ...

If the Tembhu dam victims are not compensated, the farmers will take Jalasamadhi | टेंभू धरणबाधितांना मोबदला न दिल्यास शेतकरी जलसमाधी घेणार

टेंभू धरणबाधितांना मोबदला न दिल्यास शेतकरी जलसमाधी घेणार

कऱ्हाड : रयत क्रांती संघटनेच्यावतीने सोमवारी गोवारे, सैदापूर येथील शेतकऱ्यांच्या उपस्थितीत टेंभू उपसा जलसिंचन योजनेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. येत्या आठ दिवसांत टेंभू धरणाच्या पाण्यात गेलेल्या जमिनीचा मोबदला देण्याची प्रक्रिया सुरू न केल्यास धरणात जलसमाधी घेण्यात येणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले आहे. रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े यांनी यात पुढाकार घेतला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, कृष्णा नदीवर टेंभू येथे २००८ मध्ये धरण बांधण्यात आले आहे. नदीवर धरण बांधण्यात आल्याने गोवारे, सैदापूर, मलकापूर या गावांतील शेतकऱ्यांची नदीकाठची जमीन गेल्या बारा वर्षांपासून पाण्याखाली गेली आहे. गेल्या बारा वर्षांपासून जमीन धरणाच्या पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न बुडल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

धरणाची भूसंपादन प्रक्रिया सुरू झाल्यापासून अनेकवेळा या शेतकऱ्यांनी टेंभू जलसिंचन विभागाला अर्ज, निवेदने दिली आहेत. परंतु येथील अधिकाऱ्यांनी या निवेदनाला केराची टोपली दाखवून दुर्लक्ष केले आहे. गोवारे येथील शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी करण्यासाठी २०१७ मध्ये वर्तमानपत्रामध्ये कृष्णा खोरे महामंडळाने खरेदीपूर्व नोटीस दिली होती. तरीही आजपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीची संपादन प्रक्रिया पूर्ण केली नाही.

धरणबाधित शेतकऱ्यांनी, एक तर आमची धरणाच्या पाण्यात गेलेली जमीन तरी परत दया, अन्यथा मोबदला तरी दया, अशी मागणी केली असून, यासंदर्भात येत्या सोमवारपर्यंत निर्णय न झाल्यास सहकुटुंब टेंभू धरणात जलसमाधी घेणार असल्याचा इशारा दिला आहे.

यावेळी रयत क्रांती संघटनेचे नेते सचिन नलवड़े, राजेंद्र पाटील, विजय पाटील, बाळासाहेब पाटील, संभाजी पवार, प्रफुल्ल कांबळे, शीतल पवार व गोवारे, सैदापूर येथील शेतकरी उपस्थित होते.

फोटो

Web Title: If the Tembhu dam victims are not compensated, the farmers will take Jalasamadhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.