गोवारेतील शेतकऱ्यांचा प्रश्न न मिटल्यास आंदोलनच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:44 IST2021-09-12T04:44:14+5:302021-09-12T04:44:14+5:30
कऱ्हाड : सैदापूर, मलकापूरच्या टेंभू प्रकल्प बाधितांचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, गोवारे येथील शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा निर्णय न ...

गोवारेतील शेतकऱ्यांचा प्रश्न न मिटल्यास आंदोलनच
कऱ्हाड : सैदापूर, मलकापूरच्या टेंभू प्रकल्प बाधितांचा प्रश्न मार्गी लागला आहे. मात्र, गोवारे येथील शेतकऱ्यांच्या मोबदल्याचा निर्णय न झाल्यास आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी नेते सचिन नलवडे यांनी दिला आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, टेंभू प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई न मिळाल्यास धरणाच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर टेंभूचे कार्यकारी अभियंता रेडियार यांनी शेतकऱ्यांची बैठक बोलवली होती. यावेळी सैदापूर येथील बाधित क्षेत्राची मोजणी करण्यासंदर्भात भूमिअभिलेख कार्यालयास पत्र दिले असल्याचे लेखी दिले, तसेच मलकापूर येथील शेतकऱ्यांचे भूसंपादन प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू आहे. इतर गावाचे प्रस्ताव तयार असून, मोबदला वाटपाचे काम लवकरच करत असल्या संदर्भात पत्र दिले आहे, परंतु गोवारे येथील बाधित शेतकऱ्यांचा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडून परत आला आहे. तो प्रश्न जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रलंबित असल्याचे सांगितले.
यावेळी नलवडे म्हणाले, ‘गोवारेच्या बाधित लोकांची एक तर जमीन परत करा अथवा मोबदला द्या. या संदर्भात जी काही कार्यवाही करायची असेल, ती टेंभू उपसा सिंचन कार्यालय यांनी करावी. योग्य ती कार्यवाही न झाल्यास टेंभू धरणाच्या पाण्यात शेतकरी जलसमाधी घेणारच आहे.’