संविधान बदलल्यास सत्यानाश!
By Admin | Updated: April 17, 2016 23:27 IST2016-04-17T21:27:44+5:302016-04-17T23:27:37+5:30
रामदास आठवले : गांधी मैदानावरील सभेत इशारा; राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार दलितांच्या मतामुळेच...

संविधान बदलल्यास सत्यानाश!
सातारा : ‘धर्म, भाषा यावर तुटत चाललेला भारत अखंड ठेवण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न झाला तर सत्यानाश केल्याशिवाय राहणार नाही,’ असा इशारा रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे खासदार रामदास आठले यांनी दिला.
दरम्यान, यावेळी त्यांनी दलित समाजाच्या मतामुळेच राज्यात शिवसेना-भाजपचे सरकार आल्याचे ठामपणे सांगितले.
दि. २६ जानेवारीपासून ‘जाती तोडो, समाज जोडो’ या अभियानांतर्गत कन्याकुमारी येथून ‘भारत भीमरथ’ची सुरुवात झाली आहे. हा रथ शनिवारी रात्री साताऱ्यात आला होता. त्यावेळी गांधी मैदानावर आयोजित सभेत खासदार आठवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी ‘रिपाइं’चे राज्य उपाध्यक्ष किशोर तपासे, जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ‘रिपाइं’च्या कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शरद गायकवाड, अण्णा वायदंडे, सतीश गायकवाड, अप्पा तुपे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासदार आठवले म्हणाले, ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती देशभरात उत्साहात साजरी केली. डॉ. आंबेडकर यांचे विचार सर्वांनाच पटलेले आहेत.
आता जातिभेद संपविण्याचे त्यांचे स्वप्न साकार करण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहोत. यापुढे समतावादी भारत निर्माण करायचा असून, त्यासाठी सर्वांनाच प्रयत्न करावा लागणार आहे.
राज्यातील मराठा व मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवे, अशी आमची भूमिका आहे,’ असेही आठवले यांनी यावेळी स्पष्ट केले.
किशोर तपासे यांनीही मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला ‘रिपाइं’चे कार्यकर्ते उपस्थित होते. शरद गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
सहा महिन्यांत गाव तिथे शाखा...
या कार्यक्रमात अशोक गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. आगामी सहा महिन्यांत ‘गाव तेथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता’ असणार आहे. ही भूमिका घेऊनच बाहेर पडणार आहे. गेल्या १५ वर्षांपासून जिल्ह्यातील पक्षाची जबाबदारी खांद्यावर आहे. त्यामुळे सर्व स्तरातील लोक पक्षाशी जोडले गेले आहेत, असेही त्यांनी सांगितले.