बंधूप्रेमाचे आदर्श उदाहरण आयुष्यभर जपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2016 23:50 IST2016-03-10T22:31:27+5:302016-03-10T23:50:12+5:30
शेतकरी, नोकरदारांचे जाधव कुटुंब : सोनगाव तर्फ सातारा येथे सुखाने राहतेय २० जणांचे कुटुंब

बंधूप्रेमाचे आदर्श उदाहरण आयुष्यभर जपले
सागर नावडकर --शेंद्रे -मानव हा समाजशील प्राणी आहे. तो समाजात जगतो, वाढतो आणि समाजाचा वारसा पुढे चालविण्यात धन्यता मानतो. कुटुंबव्यवस्था हा समाजसंस्थेचा एक अविभाज्य घटक आहे. एकविसाव्या शतकात एकत्रित कुटुंबपद्धतीचा ऱ्हास होत असलेला दिसत आहे. अपवादात्मक परिस्थितीमध्ये मात्र ग्रामीण भागात एखादाच कुटुंब एकत्रितपणे सुखात राहत असलेले दिसतात. असेच एक कुटुंब आहे, सातारा तालुक्यातील सोनगाव तर्फ सातारा येथील जाधव परिवार. दिवंगत बापूराव गोविंद जाधव व दिवंगत महादेव गोविंद जाधव यांचे तीन पिढ्यांचे कुटुंब आजही एकत्रितपणे गुण्यागोविंदाने नांदत आहे. या कुटुंबातील लोकांचे एकत्रित राहणे आजच्या समाजव्यवस्थेत आदर्श आहे. कुटुंबातील सदस्य संख्या वीस आहे.
बापू गोविंद जाधव, महादेव गोविंद जाधव हे दोघे बंधू पैकी थोरले बंधू बापू जाधव यांचे एक वर्षापूर्वी तर महादेव जाधव यांचे १५ वर्षांपूर्वी निधन झाले आहे. आपल्या संपूर्ण हयातीत हे भाऊ राम-लक्ष्मणाप्रमाणे एकत्र राहिले. दिवंगत बापू जाधव यांना तीन मुले आहेत, तर दिवंगत महादेव जाधव यांना दोन मुले आहेत. दिवंगत बापू जाधव यांचे थोरले चिरंजीव गोविंद हे बँकेत नोकरी आहेत. द्वितीय चिरंजीव युवराज हे शेती तर तृतीय चिरंजीव धनराज एका नामवंत शिक्षण संस्थेमध्ये नोकरीस आहेत. दिवंगत महादेव जाधव यांचे थोरले चिरंजीव हिम्मत हे शेती सांभाळत. द्वितीय चिरंजीव देवराज हे ट्रान्सपोर्ट व्यावसायिक आहेत. या कुटुंबाला नऊ एकर शेती आहे. शेतातून ऊस व खरिपाची पिके घेतली जातात. भावांना कामे वाटून देऊन शेती केली जाते. या सर्वांच्या पत्नीही मनमिळावू स्वभावाच्या आहेत. आपापल्या वाट्याची कामे करून त्या आपला पतींना खंबीर साथ देतात. शेतीपूरक दुग्ध व्यवसायही या कुटुंबामध्ये केला जातो. शेतीला आपले सर्वस्व मानून युवराज व हिम्मत जाधव शेती करतात. कुटुंबाचा किराणा खर्च ही बराचसा व्यापक आहे. या कुटुंबाला महिन्याला एक तेल डबा, ४० किलो ज्वारी, ४० किलो गहू, ३० किलो तांदूळ व २५००-३००० रुपयांचा भाजीपाला लागतो. गोविंद जाधव यांची एक कन्या इंजिनिअर आहे. बापू जाधव वयाच्या ८० वर्षांनंतरही ते भैरवनाथ मंदिरात आरती करत, त्यांच्याच विचारांचा वसा पुढची पिढी चालवताना दिसते.
असे आहे जाधव कुटुंब..
दिवंगत बापू जाधव यांचे तीन चिरंजीव थोरले गोविंद जाधव. त्यांना दोन मुले व एक मुलगी राधिका. राधिका ही इंजिनिअर आहे. द्वितीय चिरंजीव युवराज यांना एक मुलगा व एक मुलगी तर तृतीय धनराज यांनाही एक मुलगा व एक मुलगी. दिवंगत महादेव जाधव यांचे दोन मुलांपैकी हिम्मत यांना एक मुला व एक मुलगी तर देवराज यांना एक मुलगा आहे. वडिलांच्या पश्चात या सर्व भावंडांनी परस्परांना सांभाळून आणि एकमेकांच्या मतांचा आदर राखून नात्यातील ओलावा जोपासला आहे.
एकत्र कुटुंबाचा आनंद हा वेगळाच असतो. आमचे वडील तसेच काकांच्या विचारांचा वसा व वारसा आमची या पुढील प्रत्येक पिढी चालवेल. एकीच्या बळामुळे आमच्या कुटुंबाने प्रगती केली आहे.
- हिम्मत जाधव