मित्रवियोगाच्या धक्क्याने अतिदक्षता विभागात

By Admin | Updated: February 7, 2015 00:09 IST2015-02-06T22:40:51+5:302015-02-07T00:09:03+5:30

मयुरेशच्या मृत्यूनंतर.. : राष्ट्रीय नेटबॉल खेळाडू गणेशवर मायणीत उपचार; नेत्यांसह प्रशासनचीही पाठ

In the ICU section with the help of friends | मित्रवियोगाच्या धक्क्याने अतिदक्षता विभागात

मित्रवियोगाच्या धक्क्याने अतिदक्षता विभागात

मायणी : केरळ येथील राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत खटाव तालुक्यातील मायणीचा युवा खेळाडू मयुरेश भगवान पवार याच्या धक्कादायक निधनाने संपूर्ण क्रीडा जगताला फार मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्र एका युवा खेळाडूस मुकल्याचे दु:ख अद्यापही कमी झाले नाही. याच स्पर्धेसाठी मायणीतील दुसरा युवा खेळाडू गणेश भारत चौधरी एकमेव प्रत्यक्षदर्शी साक्षीदार आहे. तो सध्या मायणीत अतिदक्षता विभागात औषधोपचार घेत असून, या धक्क्यातून तो अद्यापही सावरला नाही. मात्र त्याची दखल ना प्रशासनाकडून ना लोकप्रतिनिधींकडून घेतली गेली नसल्याने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीची भावना पसरली आहे.
मयुरेश गेला, आता त्याच तोडीच्या गणेशची तरी प्रशासनाने काळजी घ्यावी, अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अनेक नागरिकांतून व्यक्त केल्या आहेत. अशा प्रकारच्या घटनेमुळे यापुढे कोणत्याही स्पर्धेसाठी गणेशला पाठवायचे नाही, अशा मानसिकतेत त्याचे कुटुंबीय आहेत.मयुरेशसह गणेश चौधरी हा देखील खेळात सहभागी झाला होता. या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सातारा जिल्ह्यातून मयुरेश आणि गणेशची निवड झाली होती. मंगळवार, दि. ३ फेब्रुवारीला दुपारी ११.३० ते १२.३० या वेळेत चंदिगड विरुध्द महाराष्ट्र असा सामना होता. पहिला हाफ झाल्यानंतर मयुरेशच्या छातीत दुखण्यास प्रारंभ झाला होता. तसे त्याने प्रशिक्षकाला सांगितले. मात्र, अती खेळण्यामुळे छातीत दुखत असेल, या भावनेने प्रशिक्षकने सामना संपल्यानंतर दाखवू, असे मयुरेशला सांगितले. तशाच अवस्थेत मयुरेशने दुसरी हाफ देखील पूर्ण खेळली. या सामन्यात महाराष्ट्राचा पराभव झाल्याने संपूर्ण महाराष्ट्राचा संघ नाराज होता. अशा अवस्थेत सामना संपल्यानंतर तेथे शेजारीच असलेल्या बीचवर सर्व खेळाडू फोटो काढण्यास बीचवर गेले. तेथे मयुरेश समुद्रात फोटो काढण्यास गेला. तिथे चक्कर आल्याने तो खाली पडला आणि त्याच्या नाकातोंडात पाणी गेल्याने मृत्यू झाला.गणेशने दोन वेळा सुवर्णपदक प्राप्त केले आहे. तो खळाडू व प्रशिक्षक म्हणून नेटबॉल असोसिएशनच्या वतीने उत्कृष्ठ कार्य केले आहे.उत्कृष्ठ खेळाडूप्रमाणे उत्कृष्ठ पंच म्हणून व देखील त्याने काम केले आहे. वर्धा, मूर्तिजापूर, सोलापूर, सातारा, बेंगलोर, बिहार आदी ठिकाणी त्याने नेटबॉल खेळाडू म्हणून मैदान गाजविले आहे. (वार्ताहर)

खेळाडूंविषयी प्रशासनाची कमालीची अनास्था
गेले दोन-चार दिवस गणेश दवाखान्यामध्ये आहे. जिल्हा व राज्य नेटबॉल संघटनेचे प्रतिनिधी व लोकप्रतिनिधींनी त्याच्या प्रकृतीविषयी कोणतीही चौकशी केली नसल्याची खंत त्याच्या कुटुंबीयांकडून व्यक्त करण्यात आली आहे. खेळाडूंना फक्त जिल्हा व राज्यात नावापुरते वापरायचे व नंतर सोडून द्यायचे, या प्रवृत्तीबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करून अशा प्रवृत्तींमुळे या पुढील काळात त्याला खेळायला पाठवायचे कसे, असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
मयुरेशने देखील अत्यंत जिद्दीने परिश्रमपूर्वक प्रयत्न करून व आर्थिक अडचणींवर मात करून या खेळातील सर्व कौशल्ये प्राप्त केली होती. त्यामुळेच अत्यंत ग्रामीण भागातील व कोणत्याही क्रीडाविषयक सुविधा वा मार्गदर्शनाची सोय नसताना परिश्रम घेऊन या खेळात आपली हुकूमत निर्माण केली होती.

Web Title: In the ICU section with the help of friends

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.