आईशप्पथ.. यापुढे मी शिवी देणार नाही !
By Admin | Updated: January 1, 2015 00:16 IST2014-12-31T22:15:10+5:302015-01-01T00:16:19+5:30
महिलांचा करूया आदर : नव्या वर्षात जीभ ‘वळणदार’ करण्याचा अनेक पुरूषांचा निर्धार

आईशप्पथ.. यापुढे मी शिवी देणार नाही !
प्रगती जाधव-पाटील - सातारा -समोरच्याच्या मनाला लागेल अशा शब्दांत त्यांच्या पर्यंत संताप पोहोचविण्याचा राजमार्ग म्हणजे शिवी! यातील दुर्दैव हे की राग स्त्रीचा असो वा पुरूषाचा शिव्या दिल्या जातात त्या स्त्रियांच्या अवयवांवरून. नवे वर्ष साजरे करताना महिलांचा सन्मान राखण्याचा संकल्प यावर्षी करूया!
मातृसत्ताक व्यवस्थेत राहूनही महिलांविषयक आदर अभावानेच पहायला मिळतो. काहीही झाले तरी आयला मायला करत अपशब्द वापरणाऱ्यांना यात पुरूषार्थ वाटतो. या नव्या वर्षात तोंडावर नियंत्रण आणून शिव्या न देण्याचा संकल्प करणे आवश्यक आहे.
कित्येकदा आपली मैत्री पक्की आहे हे सांगण्यासाठी आपण आईचा भयंकर वाईट अर्थाने उध्दार करतो! काय मिळते पुरूषांना असे बोलून असा प्रश्न अनेकदा महिलांना पडतो. पण असे घाणेरडे शब्द उच्चारून आपणही काही वाईट बोलणे ऐकण्यापेक्षा महिला शांत राहणं पसंत करतात. पण आपल्या घरातील पुरूष महिलांविषयी इतक्या वाईट थराला जावून बोलू शकतो यामुळे महिला प्रचंड दहशतीखाली असतात. पाश्चात्य संस्कृती आपल्याकडे लगेच आत्मसात केल्या जातात. पण इंग्रजीत असणाऱ्या शिव्या कुठेही महिलांवर घसरत नाहीत. खेदाने नमुद करावेसे वाटते की सर्वाधिक निच्चस्तरीय शिव्या मोठ्या प्रमाणावर मराठी भाषेत दिल्या जातात. चला... किमान या नव्या वर्षी आपण संकल्प करूया आणि महिलांप्रती आदर प्रदर्शित करत शिव्या देणं थांबवुया!
महिलांविषयक शब्दच अधिक
मराठी मध्ये बहुतांश शिव्या या आईवरूनच आहेत. स्वत:ची आई आणि बहिण पुरूषांसाठी स्वाभिमान असतो. याला डिवचले की पुरूष चिडतो, असा एक सार्वत्रिक समज आहे. त्यामुळे बहुतांश शिव्या या आई आणि बहिणीवरून दिल्या जातात. या उलट पुरूषांवरून शिव्यांचा वापर फारसा होत नाही.
का देतात शिव्या...!
अनेकदा किरकोळ कारणांवरून वाद होतात. जेव्हा भांडणाचे मुद्दे संपतात त्यावेळी शिव्यांची लाखोली वाहिली जाते. अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तिला खुप राग आलाय असे मानले जाते आणि मग समोरचा माणूस शांत होतो. हे सर्रास घडत असल्यामुळे आता लोकांना शिव्या देण्यात पुरूषार्थ वाटू लागला. नक्को इतके वाईट ऐकण्यापेक्षा आपणच शहाणपणा करून शांत राहू अशी माघाराची भूमिका समोरचा घेतो. याचा अर्थ शिवी देणारा माणूस मला कसे सगळे घाबरले असा काढतो.
कोण देतात शिव्या...!
गुन्हेगार, पोलिस, चतुर्थ श्रेणी कर्मचारी, अवजड वाहनचालक, तळीराम, महाविद्यालयीन युवक, व्यावसायिक यांच्यासह अनेकजण परस्परांना सहज हाक मारण्याच्या आवेगात शिव्या देताना सार्वत्रिक आढळून येतात.
गुन्हेगारांबरोबर पोलिसांचा सारखा संबंध येत असल्यामुळे पोलिस सर्वाधिक शिव्या देतात, असा सामान्यांचा समज आहे. वास्तविक पाहता आता सुशिक्षित तरूण या खात्यात येत असल्यामुळे शिव्या देणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. नवीन वर्षात जर कोणाला पोलिस शिव्या देताना आढळले, तर त्यांनी तातडीने याविषयी माहिती मला द्यावी.
- राजीव मुठाणे, पोलिस निरिक्षक, सातारा
आमच्या ग्रुपमध्ये एक मुलगी आहे. सहज काही बोलायचे म्हटले तरीही तिच्या तोंडून ‘नालायक’ हा शब्द निघतो. आम्ही याविषयी वारंवार तिला सांगितले आहे. आता नवीन वर्षाचा संकल्प म्हणून आम्ही तीला हा शब्द उच्चारू न देण्याचा संकल्प केला आहे. यासाठी तीला प्रसंगी दंडही करण्याची आमची तयारी आहे.
- प्रियांका शिंदे,
विद्यार्थीनी
वाद मिटविण्यासाठी अशीलांना आॅफीसमध्ये बोलवावे लागते. काहीदा त्यांच्यात अशी भांडणे जुंपतात की अर्वाच्च शिवीगाळाची जणू स्पर्धाच लागली आहे. अशाावेळी उपस्थित महिला खजिलपणे मान खाली घालून बसतात. म्हणून यापुढे आॅफीसमध्ये कोणीही शिव्या देणार नाही असा संकल्प मी केला आहे.
- अॅड. धीरज घाडगे, सातारा