लोकशाहीसाठी तुरुंगातही जाईन
By Admin | Updated: November 14, 2014 23:17 IST2014-11-14T22:27:44+5:302014-11-14T23:17:47+5:30
जयकुमार गोरे : फौजदारी गुन्हा दाखल झाल्यास जामीनही घेणार नाही

लोकशाहीसाठी तुरुंगातही जाईन
सातारा : ‘सरकारने बहुमत सिद्ध न केल्यामुळे राज्यपालांच्या आदेशाचेच उल्लंघन झाले आहे. त्यामुळे आपण अभिभाषण करू नये, हे सांगण्यासाठी आम्ही विधानसभेच्या पायरीवर बसलो होतो. तरीही आम्हाला निलंबित केले आहे. लोकशाही वाचविण्यासाठी तुरुंगातही जाण्यास तयार आहे,’ असे मत काँग्रेसचे निलंबित आमदार जयकुमार गोरे यांनी केले.
विधानसभेतून निलंबित केल्यानंतर जयकुमार गोरे प्रथमच सातारा येथे आले. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांना भेटण्यासाठी माण तालुक्यातून शेकडो समर्थक आले होते. गोरे म्हणाले, ‘सत्तेत आलेल्या सरकारने विश्वासदर्शक ठराव मंजुरीसाठी मतदान घेणे आवश्यक होते. यामध्ये ठरावाला होय म्हणणारे, नाही म्हणणारे अन् तटस्थ राहणारे किती आमदार, हे पाहणे गरजेचे होते. यासाठी अध्यक्षांकडे मतदानाची मागणी करण्यासाठी माझ्यासह अनेक जण आग्रही होते. आम्ही मागणी करूनही मतदान न घेतल्याने राज्यपालांच्या आदेशाचेच उल्लंघन झाले आहे. त्यामुळे आपण अभिभाषण करू नये, हे सांगण्यासाठी आम्ही राज्यपालांची वेळही मागितली होती. हे सांगण्यासाठी काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह असंख्य ज्येष्ठ नेते, माजी मंत्री विधानसभेच्या पायरीवर बसलो होतो. राज्यपाल अन् आमच्यात आठ ते दहा फुटांचे अंतर होते. त्यामुळे कोठेही धक्काबुक्की झाली नाही. समितीचा अहवाल येण्यापूर्वीच सूडबुद्धीने निलंबित केले आहे,’ असा आरोपही गोरे यांनी केला.
गोरे म्हणाले, ‘लोकशाहीचे पावित्र जपण्यासाठी मी काम करणार आहे. आम्हाला निलंबित करून विधानसभेतील आवाज दाबण्याचा प्रयत्न केला तरी जनतेसमोर म्हणणे मांडायला अडवू शकत नाही. अल्पमतातील सरकार चालविण्यासाठी विरोधातील जास्तीतजास्त आमदार बाहेर काढण्याचे प्रयत्न होत आहेत. यासाठी जनआंदोलन उभारून या सरकारचे कृत्य जनतेसमोर आणणार आहे.’
पत्रकार परिषद संपल्यानंतर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार आनंदराव पाटील तेथे आले. ते म्हणाले, ‘राज्यपालांना कोणीही धक्काबुक्की केली नव्हती. तेथे अनेक माजी मंत्र्यांबरोबरच साठ ते सत्तरजण होतो. गोरे यांच्यावर झालेली कारवाई चुकीची आहे.’ (प्रतिनिधी)
सोशल मीडियावरूनच टीका
‘भाजप’ची सत्ता आणण्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या सोशल मीडियावरूनच आता भाजपवर टीका होऊ लागली आहे. यासंदर्भात अनेक पोस्ट फिरविली जात आहे, अशी टीका निलंबित आमदार गोरे यांनी केली.