माणला गतवैभव आणणार !
By Admin | Updated: July 15, 2016 22:38 IST2016-07-15T21:56:59+5:302016-07-15T22:38:02+5:30
सुभाष नरळे : राष्ट्रवादीने सर्वसामान्य कार्यकर्त्याला बळ दिल्याचे सूतोवाच

माणला गतवैभव आणणार !
सातारा : ‘माण तालुक्यात दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांचा एक खांबी तंबू होता. राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी पोळ यांचे योगदान मोलाचे ठरले आहे. ते नसते तर माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जिल्हा पातळीवर कामच करू शकला नसता. ४० वर्षांच्या कालखंडात पोळ तात्यांनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून माण तालुक्यात जे वैभव निर्माण केले होते, ते पुन्हा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे,’ असे मत जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुभाष नरळे यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला दिलेल्या सदिच्छा भेटीप्रसंगी व्यक्त केले.
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर नरळे यांनी गुरुवारी सकाळी ‘लोकमत’ कार्यालयाला भेट देऊन ‘लोकमत’चे संस्थापक संपादक व थोर स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेला अभिवादन केले. यानंतर ‘लोकमत टीम’सोबत त्यांनी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, विकासात्मक अशा विविध विषयांवर चर्चा केली.
नरळे म्हणाले, ‘सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळाला पाहिजे. त्यांची कामे वेगाने झाली पाहिजेत. दुष्काळाशी सामना करणाऱ्या आपल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे. या बाबी दिवंगत आमदार सदाशिवराव पोळ यांनी कायम राखल्या. राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावले. पक्षाविषयी सर्वसामान्यांमध्ये आपुलकीचे वातावरण होते. अजूनही ही आपुलकी आम्ही जपली आहे. तात्यांच्या आदर्शाप्रमाणे काम करत असताना सर्वसामान्यांची अडवणूक होऊ नये, त्यांना दिलासा मिळावा, असे निर्णय घेऊन वेळप्रसंगी कामात त्यांना मदत करण्याचे प्रयत्न आम्ही नेहमी करत असतो.’
‘मागील दहा वर्षांच्या कालखंडात माण तालुक्यात राष्ट्रवादीसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली. पिढी बदलली तशा लोकांच्या अपेक्षा बदलल्या. नवीन तरुण मतदार आले. याचा फायदा उठवून विरोधकांनी तालुक्याची सत्ता मिळविली आहे. या बदलत्या काळात तात्यांनी अनेकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला, तरी देखील दहा वर्षांपूर्वी तालुक्यात नेतृत्व बदल झाला. तात्यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीला तालुक्यात अवकळा आल्याचे केवळ सांगितले जात आहे. वास्तव परिस्थिती तशी नाही. जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमध्ये आम्ही तुलनेने चांगले आहोत. यात आणखी भर घालण्यासाठी व राष्ट्रवादीला बळ देण्यासाठी आम्ही भविष्यात प्रयत्न करणार आहोत.
विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी माण तालुक्याला ऊर्जितावस्था आणण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या प्रयत्नामुळेच माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळाले आहे. कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या मंडळींना राष्ट्रवादीने मोठे केले आहे. कोणत्याही वैयक्तिक राजकीय अपेक्षेविना सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी रामराजेंनी हा निर्णय घेतला आहे.’
प्रतापसिंह हायस्कूल ‘आयडॉल’ बनवू
‘शिक्षण, आरोग्य या बाबींना मी महत्त्व देतो. आजच्या घडीला सयाजी हायस्कूल व कल्याणी विद्यालयामध्ये गुणवत्तेशिवाय मुलांना प्रवेश मिळत नाहीत. या परिस्थितीत जिल्हा परिषदेचे प्रतापसिंह हायस्कूलही ‘आयडॉल’ बनवू. या हायस्कूलमध्ये सर्वसामान्यांच्या गुणवंत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळू शकेल. काही दिवसांतच आमचे हे स्वप्न आम्ही साकार करू,’ असा विश्वासही नरळे यांनी व्यक्त केला.
शिवाजीरावांनी
थांबायला हवं होतं
शिवाजीराव शिंदे हे माझे जवळचे स्नेही आहेत. त्यांना कृषी सभापतिपदाची संधी दिली गेली होती. पक्षाच्या निर्णयानुसार त्यांनी थांबायला हवं होतं. वेळीच राजीनामा दिला असता तर अविश्वास आणण्याची वेळ त्यांच्यावर आली नसती.