सातारा : स्थानिक स्वराज संस्थेची निवडणूक चार महिन्यात घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीने एकत्रितपणे ही निवडणूक लढवायला हवी, असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केले. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकत्र येणार का ? पत्रकारांच्या या प्रश्नावर त्यांनी मी अजूनतरी कुंडलीचा अभ्यास केला नाही, असे उत्तर दिले.सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात टंचाई आढावा बैठक गुरुवारी झाली. यावेळी पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक एकत्रित लढविणार का ? असा प्रश्न पत्रकारांनी केला. यावर देसाई म्हणाले, न्यायालयाने निवडणुकीचे निर्देश दिले, तेव्हा चाैंडी येथे मंत्रिमंडळ बैठकीत आम्ही होतो. अजून मुंबईला गेलो नाही. पण, महायुतीत एक समन्वय समिती आहे. या समितीत प्रथम चर्चा होऊन एकमत होईल आणि मार्ग निघेल. पण, माझे वैयक्तिक मत आहे की महायुतीने एकत्र येऊन निवडणूक लढविली पाहिजे.राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटायला नको, असे वक्तव्य केले. तसेच, शिंदेसेना आणि उद्धवसेना एकत्र येऊ शकतात का? असा प्रश्न पालकमंत्री देसाई यांना केला. यावर त्यांनी मी साधा कार्यकर्ता आहे, त्यांनाच विचारा. अजूनतरी मी कुंडलीचा अभ्यास केला नाही, असे उत्तर दिले.
गटाचे ठरलेले नाही..जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीचे गण वाढले आहेत. त्यामुळे ही निवडणूक जुन्या की नवीन गट-गण रचनेनुसार होणार, या प्रश्नावर देसाई म्हणाले, यावर त्यांनी अजून काही ठरलेले नाही. याबाबत माहिती घेण्यात येत आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.