शंभराचं पेट्रोल कधी संपतं कळतच नाय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:36 IST2021-03-07T04:36:14+5:302021-03-07T04:36:14+5:30

पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने शंभर रुपयांत बाटलीभर पेट्रोल येते. ते कधी संपलं हे कळतच नाही. त्यामुळे भर उन्हात ...

I don't know when I will run out of petrol | शंभराचं पेट्रोल कधी संपतं कळतच नाय

शंभराचं पेट्रोल कधी संपतं कळतच नाय

पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असल्याने शंभर रुपयांत बाटलीभर पेट्रोल येते. ते कधी संपलं हे कळतच नाही. त्यामुळे भर उन्हात गाडी ढकलत नेण्याची वेळ अनेकांवर येत असते. (छाया : जावेद खान)

००००००

पाणीपातळी खाली

सातारा : साताऱ्यासह ग्रामीण भागातील अनेकांच्या घरी कूपनलिका आहेत. उन्हाची चाहूल लागायला लागली असून, भू-जल पातळी खालावू लागली आहे. त्यामुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे. यापासून आतापासूनच पाणी कपात करण्याची गरज निर्माण झाली आहे.

००००

कचऱ्यामुळे प्रदूषण

शिरवळ : शिरवळमध्ये अनेक महिन्यांपासून कचरा डेपोचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यामुळे नागरिकांना काय करावे हे समजत नाही. ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा जमा केलेला असतो तो सतत पेटत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरत असते. त्यामुळे नागरिकांना नाक मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे.

०००००

रोज लागतोय वणवा

सातारा : साताऱ्यातील यवतेश्वर, पेेढ्याचा भैरोबा डोंगराला सातत्याने आगी लावण्याच्या घटनांमध्ये दररोज वाढ होत आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वनसंपदा जळून नष्ट होत आहे. अनेक प्राणी मृत्युमुखी पडत आहेत. त्यामुळे निसर्गाचे अतोनात नुकसान होत आहे.

०००००००

पर्यटकांमध्ये वाढच

पाचगणी : पाचगणीसह परिसरात सलग सुट्या असल्यानंतर पर्यटक लांबलांबून फिरण्यासाठी येत आहेत. मात्र, राज्याच्या विविध भागात कोरोनाचा फैलाव होत आहे. यामुळे स्थानिकांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते. पर्यटनामुळे आर्थिक चक्र चालत असले तरी तपासणी करूनच सोडण्याची गरज आहे.

००००००००

घाटात जैविक कचरा

वाई : वाई-पाचगणी मार्गावरील पसरणी घाटात सातत्याने जैविक कचरा, तसेच हॉटेलमधील शिल्लक राहिलेले अन्न आणून टाकले जात आहे. शिल्लक अन्न खाण्यासाठी पक्षी येतात. तेथेच जैविक कचरा पडत असल्याने भविष्यात मोठी गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते.

०००

दातार-शेंदुरे स्कूलमध्ये रक्तदान शिबिर

सातारा : जागतिक महिला दिनानिमित्त डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या दातार-शेंदुरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये सोमवारी (दि. ८) सकाळी नऊ वाजता रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. माऊली ब्लड बँक, सातारा यांच्यावतीने कोरोना नियमावलीचे पालन करून रक्त संकलन केले जाईल. या शिबिरात जास्तीत जास्त रक्तदात्यांनी सहभागी होऊन रक्तदान करावे, असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका शबनम तरडे यांनी केले आहे.

०००००

जीममध्ये पूर्ववत गर्दी

सातारा : कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासनाने गेल्या वर्षी जीम बंद केल्या होत्या. आता त्या पुन्हा पूर्ववत सुरू झाल्या आहेत. तरुणाईही त्यांच्या ठरलेल्या वेळेला जीममध्ये जाऊन व्यायाम करीत असते. काही ठिकाणी बॅच वाढविल्या आहेत.

०००००००००

खेळाबाबत संभ्रम

सातारा : कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाने १ एप्रिलपर्यंत पाचवी ते नववीपर्यंतच्या शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मुलं घरातच आहेत. मात्र, ते दिवसभर मित्रांसमवेत खेळण्यात दंग असतात. त्यामुळे त्यांना बाहेर पाठवावे का नाही याबाबत पालकांत संभ्रम आहे.

०००००

संत्र्यांचे दर उतरले

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत संत्रांची आवक वाढली आहे. त्यामुळे संत्र्यांचे दरही कमी झाले आहेत. यामध्ये राजवाडा परिसरातील गाड्यांवर शनिवारी सरासरी चाळीस ते पन्नास रुपये किलो दराने संत्र्यांची विक्री केली जात होती. त्यामुळे त्यांना इतर फळांच्या तुलनेत मागणीही अधिक होती.

०००००००

घंटागाडीतून कचरा

सातारा : सातारा शहरातील कचरा घंटागाडीतून जमा केला जातो. मात्र, अनेकदा तो झाकून ठेवला जात नाही. सोनगाव कचरा डेपोकडे तो घेऊन जात असताना तो रस्त्यात पडत असतो. त्यामुळे पाठीमागून येत असलेल्या दुचाकीस्वारांच्या डोळ्यांत कचरा जातो.

०००००००

सुरक्षेच्या दोऱ्या गायब

सातारा : कोरोना काळात गेल्या वर्षी दुकानदार आणि ग्राहक यांच्या सुरक्षित अंतर राहावे, यासाठी कळक, दोऱ्या बांधल्या जात होत्या. आता कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढत आहेत. तरीही काळजी घेतली जात नाही. सुरक्षेच्या दोऱ्या, कळक गायब झाले आहेत.

००००००

खणआळीत डांबरीकरणास प्रारंभ

सातारा : साताऱ्यातील राजपथ, तसेच राधिका रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. आता अंतर्गत रस्त्यांच्या डांबरीकरणास प्रारंभ झाला आहे. पोलीस मुख्यालयापासून बसस्थानक या रस्त्याचे डांबरीकरण गेल्या आठवड्यात केले, तर शनिवारी खणआळीतील डांबरीकरण केले जात होते. या मार्गावर वाहनचालकांनी जाऊ नये म्हणून राजपथावर रस्ता बंद केला होता. शनिवारी बाजारपेठ बंद असते. त्यामुळे फारसा अडथळा झाला नाही.

०००००

एसटीत गर्दी

वडूज : कोरोनाचा शिरकाव वाढत असतानाही राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्यांना नेहमीप्रमाणेच गर्दी होत आहे. ही बाब एसटीच्यादृष्टीने चांगली असली तरी अनेक नागरिक, प्रवासी योग्य ती खबरदारी घेत नाहीत. त्यामुळे रुग्ण संख्या वाढण्याचा धाेका कायम आहे.

००००००००००

पाणपोईची गरज

सातारा : सातारा जिल्ह्यातील एसटीमध्ये प्रवासी संख्या पुन्हा वाढत आहे. मात्र, अनेक बसस्थानकात प्रवाशांसाठी पाणपोईची सोय नाही. त्यामुळे संबंधित प्रशासनाने बसस्थानकात प्रवाशांसाठी स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशी मागणी प्रवाशांमधून केली जात आहे.

००००

ऑनलाईन वकृत्व स्पर्धेत रचना बल्लाळ प्रथम

सातारा : जिल्हा बाल विकास समिती संचलित गोकुळ प्राथमिक शाळेतील चौथीतील विद्यार्थिनी रचना रवींद्र बल्लाळ हिने वकृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला आहे. अंबाजोगाई येथील स्वराज्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज एक आदर्श’ या विषयावर राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. रचना हिने लहान गटात प्रथम क्रमांक मिळविला आहे. बक्षिसाचे स्वरूप १ हजार १११ रुपये, मानचिन्ह, तसेच प्रशस्तिपत्र असे स्वरूप आहे.

००००००००००

Web Title: I don't know when I will run out of petrol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.